कोलकाता नाईट रायडर्सला अखेर IPL 2026 मध्ये आपला पहिला विजय मिळाला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात केकेआरने अक्षरशः हरलेला सामना खिशात घातला. 155 धावांचा पाठलाग करताना 14 व्या ओव्हरमध्ये केकेआरची अवस्था 6 बाद 85 अशी झाली होती. पण इथून रिंकू सिंग आणि अनुकूल रॉयने सामन्याचे पारडे फिरवले. केकेआरने 2 चेंडू राखून 4 विकेट्सने हा थरारक विजय मिळवला.
या विजयानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, या विजयाचा खूप आनंद होत आहे. सामन्यादरम्यान अनेक भावना मनात येत होत्या, पण वैयक्तिकरित्या मी रिंकू सिंग, अनुकूल रॉय आणि वरुण चक्रवर्तीसाठी खूप खुश आहे. वरुण चक्रवर्ती (Varun Chakrawarthy) कठीण काळातून जात होता, पण गेल्या तीन सामन्यांत त्याने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. रिंकू सिंगसाठीही हा काळ मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक होता, त्याला सामना संपवताना पाहून खूप समाधान वाटले.
अनुकूल रॉयला गोलंदाजी न देण्याबाबत रहाणेने स्पष्ट केले की, अनुकूलचे देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शन उत्तम राहिले आहे आणि तो एक आत्मविश्वासाने खेळणारा खेळाडू आहे. आज मैदानावर डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांची जोडी (Left-Right combination) असल्यामुळे त्याला गोलंदाजी देता आली नाही, पण त्या दोघांनी (रिंकू आणि अनुकूल) जी भागीदारी केली, ती पाहून आनंद झाला.
एक प्रकारे रहाणेने या विजयाचे श्रेय रिंकू सिंग, अनुकूल रॉय आणि वरुण चक्रवर्ती यांना दिले. यासोबतच त्याने 3 विकेट्स घेणाऱ्या कार्तिक त्यागी याच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. या सामन्यात रहाणे स्वतः शून्यावर बाद झाला असला, तरी पहिल्या विजयामुळे तो खूप उत्साहात दिसला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत केवळ 155 धावा केल्या होत्या, पण त्यांच्या गोलंदाजांनी केकेआरची दाणादाण उडवत 85 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी विजयासाठी प्रति ओव्हर 12 धावांची गरज होती आणि सामना हातातून गेला असे वाटत होते. मात्र, रिंकू सिंग (34 चेंडूत नाबाद 53 धावा) आणि अनुकूल रॉय (16 चेंडूत नाबाद 29 धावा) या जोडीने अशक्य वाटणारा विजय केकेआरला मिळवून दिला. हा केकेआरचा या हंगामातील पहिलाच विजय आहे.






