चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2024 चा सातवा सामना खेळला गेला. या सामन्यात मराठमोळ्या अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड यांनी असं काही केलं, जे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये विशेषत: टी20 क्रिकेटमध्ये सहसा दिसतच नाही. या सामन्यात 35 वर्षीय रहाणे आणि कर्णधार ऋतुराज यांनी चक्क 4 धावा पळून काढल्या!
ही घटना 9व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर घडली. साई किशोरनं टाकलेला चेंडू अजिंक्य रहाणेनं डीप मिडविकेटच्या दिशेने खेळला. चेंडू पकडत असताना गुजरातच्या खेळाडूंनी मिसफिल्ड केलं, ज्याचा फायदा घेत रहाणे आणि ऋतुराज गायकवाड यांनी 4 धावा पळून काढल्या. टी 20 क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूनं पळून चार धावा काढणं फार दुर्मिळ आहे, कारण या फॉरमॅटमध्ये खेळाडूंना बहुतेक मोठे फटके मारणं आवडतं. यामुळे फलंदाजी करताना खेळाडूंना कमी थकवा येतो.
रहाणेनं गुजरात विरुद्ध चेन्नईकडून 12 चेंडूत 12 धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने एकही चौकार लगावला नाही. 11व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रहाणेची विकेट पडली. तो साई किशोरच्या गोलंदाजीत स्टंपिंग बाद झाला. रहाणे बाद झाला तेव्हा चेन्नईची धावसंख्या 2 बाद 104 धावा एवढी होती. बाद होण्यापूर्वी त्यानं कर्णधार गायकवाडसोबत दुसऱ्या विकेटसाठी 42 (29 चेंडू) धावांची भागीदारी केली.
या आधी आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणेनं छोटी पण वेगवान खेळी केली होती. त्यानं 19 चेंडूत 2 षटकार मारत 27 धावा केल्या. गेल्या हंगामात म्हणजे 2023 च्या आयपीएलमध्येही रहाणेनं चेन्नईसाठी चमकदार कामगिरी केली होती. 2023 च्या आयपीएलमध्ये रहाणेनं चेन्नईसाठी 14 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 32.60 च्या सरासरीनं आणि 172.49 च्या स्ट्राइक रेटनं 326 धावा ठोकल्या. या कालावधीत, त्यानं 2 अर्धशतकं मारली, ज्यामध्ये 71* ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.
चेन्नईचा पुढील सामना आता 31 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. हा सामना विशाखापट्टनम येथे खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 । ऋतुराजच्या नेतृत्वात सीएसकेचा सलग दुसरा विजय, गुजरातवर 63 धावांनी मात
वय फक्त आकडा! 42वर्षीय धोनीची जबरदस्त डाईव्ह, झेल पकडल्यावर सहकारीही आश्चर्यचकित
बॅटिंग घेऊ की बॉलिंग? नाणेफेक जिंकल्यानंतर शुबमन गिल कंफ्यूज, व्हिडिओ व्हायरल