मुंबई । भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे वनडे संघात पुनरागमन करू इच्छितो. मुंबईचा हा फलंदाज वनडे संघात तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार आहे. संघात पुनरागमन करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे.
स्टायलिश फलंदाज अजिंक्य राहणे यापूर्वी भारतीय संघात सलामीला आणि त्याचबरोबर मधल्या फळीत खेळत होता. 2018 साली चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला संघात पुनरागमन करता आले नाही. तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे.
रहाणे म्हणाला की, ” वनडेमध्ये सलामीला खेळण्यास नेहमीच आनंद होतो. पण मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास संधी मिळाली तरीही मला कोणतीच अडचण नाही. या दोन्ही जागेवर मी खेळण्यास तयार आहे. मी बरेच दिवस चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होतो. या दोन्ही क्रमांकावर खेळताना मी चांगली कामगिरी करू शकतो.”
31 वर्षीय अजिंक्य रहाणेने भारताकडून खेळताना 90 वनडे सामन्यात 35.26 च्या सरासरीने 2962 धावा केल्या आहेत. यात 3 शतके आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे.
“क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी मानसिक दृष्टीने तयार आहे. मी संघात कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार आहे. मला काहीही करून वनडे संघात पुनरागमन करायचे आहे. मला माहीत नाही की मी संघात स्थान बनवण्यात कधी यशस्वी होईन. सतत सकारात्मक विचार करत राहण्याची गरज आहे,” असे अजिंक्य रहाणे म्हणाला.