आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा ८ सप्टेंबरला झाली होती आणि त्यानंतर आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. विश्वचषकासाठी भारतीय संघात निवडलेल्या काही खेळाडूंचे प्रदर्शन आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खूपच खराब दिसले.
आयसीसीच्या नियमांप्रमाणे विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात १० ऑक्टोबरपर्यंत बदल केला जाऊ शकतो. अशात भारताच्या संघात खराब फॉर्ममधील खेळाडूंच्या बदल्यात चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्याची मागणी होते आहे. मात्र, भारताच्या एका माजी खेळाडूच्या मते खराब फॉर्ममध्ये असले तरीही टी२० संघातील या खेळाडूंवर विश्वास दाखवला पाहिजे.
भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज अजीत आगरकर स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात याबद्दल बोलत होते. विश्वचषकापूर्वी भारतीय संघात बदल करण्याविषयी बोलताना ते म्हणाले की, “माझ्या मते एकदा जर तुम्ही विश्वचषकासाठी संघ निवडला तर दुखापत सोडून काही बदल केले पाहिजेत, असे मला नाही वाटत. होय, यावेळी असे खेळाडू आहेत, जे त्यांच्या चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत, पण तो फॉर्म बदलण्यासाठी फक्त एका डावाची गरज आहे. मग ती गोलंदाजी असो किंवा फलंदाजी आणि हे आयपीएल संपण्याच्या आधीही होऊ शकते.”
आगरकरांच्या मते निवडकर्त्यांनी निवडलेल्या खेळाडूंवर विश्वास दाखवला पाहिजे. तो पुढे बोलताना म्हणाला की, “जर तुम्हाला वाटत आहे की, विश्वचषकात जाण्यासाठी तुम्ही सर्वोत्कृष्ट १५ खेळाडू निवडले आहेत. तर माझे वैयक्तिक मत आहे की, मी त्यांच्यासोबत असेल. कारणे जेव्हा गोष्टी एवढ्या चांगल्या दिसत नसतील, तेव्हाही तुम्हाला लोकांवर विश्वास ठेवावा लागेल. कारण गोष्टी खूप लवकर बदलू शकतात.”
दरम्यान, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात अशा काही खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करून दाखवले आहे, ज्यांना विश्वचषकासाठी संघात संधी मिळालेली नाही. तर दुसरीकडे जे खेळाडू विश्वचषकासाठी भारतीय संघात निवडले गेले आहेत, त्यांनी काही खास कमाल केलेली नाही. अशात १० ऑक्टोबरपूर्वी निवडकर्ते संघात काय बदल करतात हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इशानने सॉलिड षटकार ठोकत जिंकवला सामना, आनंदात हार्दिकचे डोक्यावर चुंबन; व्हिडिओ तुफान व्हायरल
‘मिशन टी२० विश्वचषका’साठी इंग्लंडचा संघ ओमानमध्ये दाखल, ‘या’ तारखेला खेळणार पहिला सामना
लाजिरवाण्या पराभवानंतर निराश झाला संजू; सामन्यानंतर दिली उद्विग्न प्रतिक्रिया