भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) मागील काही काळात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीत केलेली उत्कृष्ट कामगिरी. मोहाली कसोटीमधील या अष्टपैलूचे सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी पाहून भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने (Aakash Chopra) मोठे व्यक्तव्य केले आहे. त्याच्या मते जडेजा सध्या कसोटी प्रकारामधील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू आहे आणि तो बेन स्टोक्सपेक्षा (Ben Stokes) खुप पूढे आहे.
मोहाली कसोटीमध्ये जडेजाने दमदार कामगिरी करत १७५ धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्या खेळीमुळे भारतीय संघ ५७४ धावा करु शकला. तो अजूनही खेळू शकला असता, परंतु तो खेळत असतानाच रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी सामना घोषित केला. त्यानंतर त्याने गोलंदाजीत देखील चांगली कामगिरी केली आहे, यामध्ये त्याने पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या.
याबाबत आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “मी या गोष्टीची घोषणा करतो की, सध्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू रविंद्र जडेजा आहे. मी त्याला बेन स्टोक्सपेक्षा खुप पुढे आहे, असे मानतो. रविंद्र जडेजा गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट आहे. याबाबतीत त्याच्या जवळ केवळ बेन स्टोक्स आहे, परंतु त्याची गोलंदाजी एवढी प्रभावशाली नाही.”
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, “मी म्हणेन की जडेजा मायदेशातील सामन्यांत धावा करतो. बेन स्टोक्स सुद्धा जास्तीत जास्त धावा अशाच पद्धतीने करतो. तो जर भारतात आला तर तो १५०-१७५ धावा करु शकत नाही, तो आपल्या मायदेशात जसा खेळतो, तसा भारतात खेळू शकत नाही. जड्डूने मायदेशात १७५, १०० आणि ९० धावा केल्या आहेत आणि जेव्हा तो परदेशात जातो तेव्हा तो ५०-६० धावा करतो. तो एक अष्टपैलू-गोलंदाज आहे. बेन स्टोक्स हा फलंदाजी अष्टपैलू आहे. त्यामुळे माझ्या मते रविंद्र जडेजा हा जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
आर अश्विन झाला ‘तीस हजारी’! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘असा’ विक्रम करणारा चौथाच भारतीय
अखेर अश्विनने कपिल देव यांना टाकले मागे, बनला भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज