‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचे पोस्टर 7 जुलै म्हणजेच माजी कर्णधार एमएस धोनीच्या वाढदिवसाच्या दिवशी रिलीझ करण्यात आला होता. त्या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतने कॅप्टन कूल धोनीची भूमिका साकारली होती. तो चित्रपट सप्टेंबर महिन्यात रिलीझ झाला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारबरोबर स्पेशल- 26 आणि बेबी यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे नीरज पांडे यांनी केले होते.
अक्षयने (Akshay Kumar) सांगितले होते, की त्याला धोनीच्या भूमिकेत काम करायचे होते. परंतु पांडे (Neeraj Pandey) यांनी तो धोनीसारखा दिसत नसल्याचे सांगत त्याला नकार दिला होता. अक्षयला ऑन स्क्रीन धोनीची भूमिका साकारण्यात फार रस होता. परंतु पांडे यासाठी तयार नव्हते.
पुढे धोनीसारखा थोडाफार दिसणारा व भूमिकेला न्याय देणारा अभिनेता म्हणून हा चित्रपट सुशांतला मिळाला. त्याने यापुर्वी क्रिकेटवर आधारीतच काय पो चे हा चित्रपट केला होता. त्यामुळे त्याचाही यात त्याला भूमिका करताना उपयोग होणार होता.
पुढे सुशांतच्या जबरदस्त भूमिकेने हा चित्रपट व धोनीची छबी अजरामर केली. या भूमिकेसाठी सुशांतने २ कोटी रुपये फी घेतली होती तर आपल्या जीवनावर आधारीत चित्रपट असल्याने धोनीने २० कोटी रुपये घेतले होते. या चित्रपटमुळे पुढे सुशांतला चांगले चित्रपट मिळाले व त्याची फी देखील दुप्पट झाली होती. त्याला या चित्रपटाने बाॅलीवूडमध्ये प्रस्थापित केले होते.