आज पासून सुरु झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप या मानाच्या स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. तिला चायनीज तिपेईच्या ताइ त्झू यिंगने २१-१४, २१-१८ अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभूत केले.
३८ मिनिटे चाललेल्या या लढतीत ताइ त्झू यिंगने पहिल्या सेटमध्ये सुरवातीलाच आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सायनाने चांगले पुनरागमन करत १०-१० अशी बरोबरी साधली. मात्र त्यानंतर पुन्हा ताइ त्झू यिंगने चांगला खेळ करत आघाडी मिळवली आणि अखेर तिने हा सेट २१-१४ असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये सायनाने ताइ त्झू यिंगला चांगली लढत दिली होती. या सेटमध्येही सुरवातीला ताइ त्झू यिंगने आघाडी मिळवली होती. पण पहिल्या सेटप्रमाणेच सायनाने खेळ उंचावत नेला आणि १८-१८ अशी बरोबरी देखील साधली. परंतु अखेरच्या क्षणाला अग्रमानांकित ताइ त्झू यिंगने दुसरा सेट २१-१८ असा जिंकून सामनाही जिंकला.
या पराभवामुळे सायनाचे या स्पर्धेतील आव्हान संपले आहे. आज भारताच्या श्रीकांत किदांबी, एच एस प्रणॉय, साईप्रणीत आणि पीव्ही सिंधू यांचे सामने होणार आहेत.