---Advertisement---

अशी आहे सनरायझर्स हैद्राबादची दमदार ड्रीम ११, हा खेळाडू आहे कर्णधार

---Advertisement---

इंडियन प्रिमीयर लीगमध्ये २०१३ ला सनरायझर्स हैद्राबाद हा नवीन संघ सामील झाला. त्यांनी पहिल्या मोसमापासूनच चांगली कामगिरी केली. २०१६ पासून त्यांनी प्रत्येक मोसमात पहिल्या ४ संघांमध्ये स्थानही मिळवले. त्यांना केवळ २०१४ आणि २०१५ या २ मोसमात पहिल्या ४ संघात स्थान मिळवण्यात अपयश आले.

विशेष म्हणजे त्यांनी २०१६ ला डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपदही मिळवले. त्यांच्या संघाकडून अनेक दिग्गज खेळाडू आत्तापर्यंत खेळले तसेच सध्या त्यांच्या संघात आहेत.

या खेळाडूंचा विचार करुन सनरायझर्स हैद्राबादचा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ बनवण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.

सलामीवीर  – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार) आणि जॉनी बेअरस्टो

डेव्हिड वॉर्नर २०१४ पासून सनरायझर्स हैद्राबादकडून खेळत आहे. तसेच त्याने २०१५ ते २०१७ या ३ मोसमात सनराझर्स हैद्राबादचे कर्णधारपदही सांभाळले आहे. मात्र त्याला २०१८ ला चेंडू छेडछाडप्रकरणी बंदी असल्याने आयपीएलमध्ये खेळता आले नव्हते. पण त्याने २०१९ मध्ये तब्बल ६९२ धावा ठोकत शानदार पुनरागमन केले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला २०२० च्या आयपीएल मोसमासाठी पुन्हा एकदा हैद्राबादचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याने आत्तापर्यंत सनरायझर्सकडून खेळताना ७१ सामन्यात ५५.४४ च्या सरासरीने ३२७१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ शतकांचा आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे.

वॉर्नरला २०१९ च्या आयपीएलमोसमात जॉनी बेअरस्टोने सलामीला शानदार साथ दिली. या दोघांची जोडी २०१९ ला आयपीएलमध्ये गाजली होती. दोघांनी एकत्र खेळलेल्या प्रत्येक सामन्यात सनरायझर्सला दमदार सुरुवात करुन दिली. त्यांनी सलामीला ४ वेळा शतकी भागादारी केली. तसेच बेअरस्टोने २०१९ ला आयपीएलमध्ये सनरायझर्सकडून पदार्पण करताना १० सामन्यात ५५.६२ च्या सरासरीने ४४५ धावा केल्या.

मधली फळी – शिखर धवन, केन विलियम्सन, मनिष पांडे

शिखर धवन जरी सलामीवीर फलंदाज असला तरी हैैद्राबादकडून वॉर्नर आणि बेअरस्टोची जोडी अधिक यशस्वी ठरली असल्याने तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. शिखर २०१३ ते २०१८ पर्यंत सनरायझर्सकडून खेळला आहे. तसेच त्याने २०१३ आणि २०१४ मध्ये सनरायझर्सचे नेतृत्वही केले. तो सनराझर्सकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंजदांमध्ये वॉर्नरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सनरायझर्सकडून ९१ सामन्यात ३५.०३ च्या सरासरीने २७६८ धावा केल्या आहेत. २०१९ पासून तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन सनरायझर्स संघाचा २०१५ पासून महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याने २०१८ ला वॉर्नरच्या अनुपस्थितीत सनरायझर्सच्या नेतृत्वाची धूरा समर्थपणे सांभाळताना त्या मोसमात तब्बल ७३५ धावा केल्या होत्या. तसेच त्याने सनरायझर्सला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यातही महत्त्वाचा वाटा उचलला होता.

त्याने आत्तापर्यंत सनरायझर्स हैद्राबादकडून ४१ सामन्यात ३८.२९ च्या सरासरीने १३०२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १२ अर्धशतकांचा समावेश आहे. तो सनरायझर्स संघाच्या मधल्या फळीला चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. तसेच परिस्थितीनुसार संयमाने तर कधी आक्रमकपणे खेळू शकतो.

मनिष पांडे मधल्या फळीत विलियम्सनला चांगली साथ देऊ शकतो. तसेच तो नंतर गरज पडल्यास तळातल्या फलंदाजांनाही बरोबर घेऊन सनरायझर्सला पुढे घेऊन जाऊ शकतो. त्याने मागील २ मोसमात सनरायझर्सकडून चांगली कामगिरी करताना २७ सामन्यात ३३.०५ च्या सरासरीने ६ अर्धशतकांसह ६२८ धावा केल्या आहेत.

अष्टपैलू क्रिकेटपटू – युवराज सिंग, राशिद खान

भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग २०१६ आणि २०१७ ला सनराझर्सकडून खेळला. त्याने युवराजला मधल्या फळीत फलंदाजी करण्याचा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर तो गरज पडली तर गोलंदाजीही करु शकतो. तसेच सनरायझर्सकडे त्याच्या ऐवजी शाकिब अल हसन किंवा मोहम्मद नबी यांचे पर्याय आहेत. मात्र ११ जणांच्या संघात केवळ चारच परदेशी खेळाडू खेळवण्याचा नियम असल्याने युवराज या जागेसाठी सर्वोत्तम आहे.

युवराजने हैद्राबादकडून २२ सामन्यात २७.११ च्या सरासरीने ४८८ धावा केल्या आहेत. मात्र त्याने केवळ ७ डावात गोलंदाजी केली असून ८.१ षटके टाकली आहेत आणि १ विकेट घेतली आहे.

युवा फिरकीपटू राशिद खान सनराझर्सच्या गोलंदाजी फळीतील मुख्य अस्त्रांपैकी एक आहेे. त्याच्या गोलंदाजीमुळे अनेकदा सनराझर्सला फायदा झाला आहे. एवढेच नाही तर तळातल्या फलंदाजीत त्याचा थोडाफार हातभार लागू शकतो. त्याच्याकडे आक्रमक फटके मारण्याची क्षमता आहे.

तो हैद्राबादकडून २०१७ पासून खेळत असून त्याने आत्तापर्यंत ४६ सामन्यात २१.६९ च्या सरासरीने ५५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने १८ डावात फलंदाजी करताना १०४ धावाही केल्या आहेत.

गोलंदाज – भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, अमित मिश्रा, इशांत शर्मा

भुवनेश्वर कुमार सनरायझर्स हैद्राबादचा २०१४ पासून मुख्य गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. तसेच तो सनराझर्स हैद्राबादकडून १०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज आहे. त्याने ८६ सामने सनरायझर्सकडून खेेळले असून १०९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला २०१७ पासून सिद्धार्थ कौलची चांगली साथ मिळाली आहे. कौलने २०१७ पासून आत्तापर्यंत हैद्राबादकडून ३४ सामने खेळले असून २५.३२ च्या सरासरीने ४३ विकेट्स घेतल्या आहेत.

फिरकीपटू अमित मिश्रानेही सनरायझर्सकडून २०१३ आणि २०१४ च्या मोसमात खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने सनरायझर्सकडून पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध २०१३ ला हॅट्रिकही घेतली होती. त्याने सनरायझर्सकडून ३३ सामने खेळताना २७.९६ च्या सरासरीने ३० विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर सनरायझर्सकडून भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा २०१३ ते २०१५ पर्यंत खेळला आहे. त्याने २९ सामन्यात सनरायझर्सकडून खेळताना २५ विकेट्स घेतल्या आहेत.

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल इतिहासात प्रत्येक हंगामात सर्वात महागडा ठरलेला भारतीय खेळाडू

खराब खेळपट्टीमुळे रद्द केलेले ३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, २ आहेत भारतातील

५ अतिशय विचित्र गोलंदाजी शैली, ज्या पाहुन प्रेक्षकांना यायचे जोरदार हसू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---