मुंबई:- अमर क्रीडा, शिवनेरी सेवा, अंकुर स्पोर्टस्, लायन्स स्पोर्टस् यांनी विजय नवनाथ मंडळाने “अमृत महोत्सवी” वर्षानिमित आयोजित केलेल्या पुरुष प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. आज सर्वच सामने चुरशीने खेळले गेले. सेनापती बापट मार्ग, लोअर परेल येथील फिनिक्स टॉवर शेजारील मैदानात सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात काळाचौकीच्या अमर मंडळने पहिल्या डावातील १८-२७ अशा ९गुणांच्या पिछाडीवरून करीरोडच्या ओम् पिंपळेश्वर मंडळाला ३६-३४ असे चकविले. पहिल्या डावात ओमकार जाधव, शुभम साटम यांनी आक्रमक चढाया करीत ओम् पिंपळेश्वरला ९गुणांची मोठी आघाडी मिळून दिली होती. त्यांना पकडीत आकाश गोजारेने उत्तम साथ लाभली. पण दुसऱ्या डावात ते ढेपाळले. दुसऱ्या डावात अमरच्या अमर साळवी, सदाशिव चुरी यांनी झंझावाती चढाया करीत पिंपळेश्वरवर लोण देत ही आघाडी कमी करीत २ गुणांवर आणली. पुन्हा संयमी खेळ करीत संघाला विजय मिळवुन दिला. त्यांना नितीन विचारेने उत्कृष्ट पकडी करीत छान साथ दिली.
दादरच्या शिवनेरी मंडळाने ना. म. जोशी मार्गच्या बलाढ्य जय भारत क्रीडा मंडळाचा प्रतिकार ३४-२२ असा संपविला. भक्कम बचाव आणि आक्रमक चढाईच्या जोरावर शिवनेरीने पूर्वार्धात लोण देत १५-०९ अशी आश्वासक आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एक लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मनीष पड्याळ या डाव्या तसेच अजय गुरव या उजव्या मध्य रक्षकांनी अचूक वेळ साधून केलेल्या पकडी लाजबाब होत्या. या खेळाने ८०च्या दशकातील सामन्यांच्या आठवणीना उजाळा मिळाला. यश राक्षे,यश चोरगे यांनी चढाईत गडी टिपत त्यांना उत्तम साथ दिली. गेली ४-५वर्ष मेहनत घेऊन गुरुनाथ मोरजकर यांनी तयार केलेला हा संघ आज चमकदार कमगिरी करीत आहे. जय भारतच्या निखिल पाटील, अविनाश काविळकर यांनी उत्कृष्ट खेळ करीत संघाच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण ते निष्फळ ठरले. सातरस्त्याच्या अंकुर स्पोर्टस् ने मध्यांतारातील १६-१७ अशा पिछाडीवरून प्रभादेवीच्या सिद्धीप्रभा फाऊंडेशनचा विरोध ३३-२४ असा मोडून काढला. अभिमन्यू पाटील, अभिषेक भोसले यांनी मध्यांतरा नंतर धारदार चढाया करीत भराभर गुण घेण्याचा सपाटा लावला. त्यांना सिद्धेश तटकरे यांनी भक्कम पकडी करीत छान साथ दिली. त्यामुळेच अंकुरचा विजय उत्तरार्धात सोपा झाला. ओमकार पवार, सिद्धेश भोसले, मिलिंद पवार यांचा खेळ सामन्याच्या सत्रात निष्फळ ठरला.
शेवटच्या सामन्यात ना.म.जोशी मार्गच्या लायन्स स्पोर्टस् ने त्यांच्याच शेजारच्या गुड मॉर्निंग स्पोर्टस् चा ३५-३३ असा पाडाव केला. संयमी खेळ करीत पहिल्या सत्रात १७-१६ अशी आघाडी घेणाऱ्या लायन्सने दुसऱ्या सत्रात देखील तोच पवित्रा वापरत २गुणाने आपला विजय साकारला. राज आचार्य, प्रणय आळवणे, यश साळगावकर लायन्स कडून, तर साहिल राणे, विजय देसाई गुड मॉर्निंग कडून उत्कृष्ट खेळले. (Amar Krida, Shivneri Seva, Ankur Sports, Lions Sports entered the quarter-finals of the First Class Kabaddi Tournament.)
महत्वाच्या बातम्या –
Rajkot Test । ज्याने धावबाद केले, सरफराजकडून त्याचाचे झाले कौतुक, पाहा पदार्पणवीर काय म्हणाला
‘मी आणि माझ्या भावासाठी वडिलांनी…’, पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक ठोकल्यानंतर काय म्हणाला सरफराज