कोरोनाचा कठीण काळ असताना देखील भारतात आयपीएल २०२१ स्पर्धेचे जोरदार आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कडक बायो बबलचा वापर करण्यात आला होता. मात्र, पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. वृद्धिमान सहाला कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने आणि आयपीएलच्या कमिटीने बैठक घेऊन आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु भारतीय संघासाठी आता आनंदाची बातमी आहे.
येत्या काही दिवसात भारतीय संघ विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आणि इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहे. या दौऱ्यापूर्वी प्रसिद्ध कृष्णा आणि वृद्धीमान सहा हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध कृष्णाला ८ मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. सहा, प्रसिद्ध कृष्णा आणि केएल राहुल यांचे इंग्लंड दौऱ्यावर जाणे फिटनेसवर निर्भर होते.आता तिघेही पूर्णपणे फिट आहेत. आता हे खेळाडू मुंबईमध्ये विलागिकरणात राहणार आहेत.
केएल राहुल होणार मुंबईच्या दिशेने रवाना..
आयपीएल स्पर्धा सुरू असताना पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल अपेंडिक्सचा त्रास झाला होता.त्यानंतर त्याच्यावर ३ मे रोजी शस्त्रक्रिया क्रिया करण्यात आली होती. असे असतानाही त्याला विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी केएल राहुलला संधी देण्यात आली होती. परंतु तो पूर्णपणे फिट असेल तरच त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाता येईल, अशी अट बीसीसीआयने ठेवली होती. आता तो पूर्णपणे फिट असून लवकरच मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.
अमित मिश्राने दिली माहिती
वृद्धिमान सहा आणि अमित मिश्रा यांनी कोरोनातून ठीक झाल्याची गोड बातमी ट्विटर द्वारे दिली आहे. आयपीएल हंगामात कोरोनाचा शिरकाव झाल्याने आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत २९ सामने खेळवण्यात आले आहेत. उर्वरित ३१ सामने केव्हा खेळवण्यात येतील याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नाही. जर ही स्पर्धा खेळवण्यात आली नाहीतर, बीसीसीआयला २५०० कोटींचे नुकसान होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –