30 मेपासून इंग्लंड आणि वेल्स येथे विश्वचषक 2019 ची स्पर्धा रंगणार आहे. पण ही स्पर्धा सुरु होण्याआधीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्जे त्याचा आंगठा फ्रॅक्चर झाल्याने विश्वचषक 2019 स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
त्याच्याऐवजी विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघात अष्टपैलू ख्रिस मॉरिसची निवड करण्यात आली आहे. मॉरिस फ्रेब्रुवारी 2018 पासून वनडे सामना खेळलेला नाही. तसेच तो आत्तापर्यंत 34 वनडे सामने खेळला असून यात त्याने 35 विकेट्स घेतल्या आहेत.
सध्या विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात निवड करण्यात आलेले गोलंदाज मागील काही काळापासून दुखापतीचा सामना करत आहे. त्यांचा डेल स्टेन हा अनुभवी वेगवान गोलंदाज 2 आयपीएल सामने खेळल्यानंतर खांद्याच्या दुखापतीचा सामना करत आहे. तसेच रबाडाही पाठिच्या दुखापतीमुळे आयपीएल संपण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेला परतला आहे.
त्याचबरोबर लूंगी एन्गिडी हा देखील दुखापतीमुळे आयपीएलमध्ये सामील झालेला नाही. त्यामुळे विश्वचषकापूर्वी हे गोलंदाज पूर्ण फिट होण्याची दक्षिण आफ्रिकेला आशा असेल.
दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापक आणि डॉक्टर मोहम्मद मुसाजी यांनी रबाडाला पूर्ण बरे होण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून 4 वनडे सामने खेळलेला नॉर्जे काही दिवसांपूर्वी पोर्ट एलिझाबेथ येथे नेटमध्ये सराव करत असताना दुखापतग्रस्त झाला. त्याआधीही तो खांद्याच्या दुखापतीचा सामना करत होता.
त्याच्याबद्दल सांगताना मुसाजी म्हणाले, ‘त्याने लगेचच हाताच्या सर्जनची भेट घेतली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दुर्दैवाने त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी 8 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.’
त्याचबरोबर त्याच्या ऐवजी निवड करण्यात आलेल्या मॉरिसबद्दल दक्षिण आफ्रिकेचे निवड संयोजक लिंडा झोंडी यांनी सांगितले की ‘ख्रिस हा आमचा गोलंदाजीसाठी चांगला पर्याय आहे.’
‘त्याच्याकडे वेग आहे आणि तो शेवटच्या काही षटकात चांगली गोलंदाजी करु शकतो. तसेच तळातल्या फलंदाजीला तो खोली देईल. त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे.’
दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषक 2019 मधील पहिला सामना यजमान इंग्लंड विरुद्ध 30 मे ला होणार आहे.
असा आहे विश्वचषक 2019 साठी दक्षिण आफ्रिकेचा संघ –
फाफ डु प्लेसीस (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, हाशिम अमला, एडेन मार्करम, रसी व्हॅन डर दसेन, ड्वेन प्रीटोरियस, अँडील फेहलुकवायो, कागीसो रबाडा, डेल स्टेन, लुंगी एन्गिडी, ख्रिस मॉरिस, इम्रान ताहिर, तब्रिज शम्सी.
महत्त्वाच्या बातम्या –
–स्टिव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून पुनरागमन करत एका हाताने घेतला शानदार झेल, पहा व्हिडिओ
–सनरायझर्स हैद्राबादच्या चाहत्यांनी असे मजेदार ट्विट करत मानले मुंबई इंडियन्सचे आभार…
–उमेश यादवच्या नो बॉल प्रकरणानंतर अंपायरने रागात तोडला दरवाजा