गेल्या काहीवर्षात अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आपल्या कामगिरी सर्वांना प्रभावित केले आहे. त्यांनी आपल्या चांगल्या कामगिरीमुळे कसोटी संघाचा दर्जाही मिळवला. मात्र, असे असले तरी गेल्या काही वर्षांत सातत्याने त्यांच्या नेतृत्वात बदल होताना दिसत आहे. त्यामुळे बरीच चर्चाही रंगली होती. आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानने नेतृत्वात बदल केला आहे. त्यांनी अनुभवी कर्णधार असगर अफगाणला कर्णधारपदावरुन काढून टाकले आहे.
या खेळाडूकडे अफगाणिस्तानचे नेतृत्व
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी (३१ मे) झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी पुन्हा एकदा असगर अफगाणला कर्णधारपदावरुन काढून टाकले आहे. त्याला २०१९ विश्वचषकापूर्वीही त्यांनी कर्णधारपदावरुन काढले होते. पण परत त्याला कर्णधारपद सोपवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा त्याच्याकडून नेतृत्वपद काढून घेण्यात आले आहे. यावेळी कर्णधार म्हणून झिम्बाब्वेविरुद्ध झालेली खराब कामगिरी त्याच्याकडून कर्णधारपद जाण्यास कारणीभूत ठरली आहे.
त्याच्याऐवजी आता वनडे आणि कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अफगाणिस्तानने हशमतुल्लाह शाहिदीकडे सोपवली आहे. तर रहमत शाह या संघांचा उपकर्णधार असेल. टी२० संघाच्या कर्णधाराचे नाव अजून जाहीर करण्यात आले नाही. मात्र, टी२० संघाच्या उपकर्णधारपदी राशिद खान कायम असेल.
अफगाणिस्तानने नुकतेच झिम्बाब्वेविरुद्ध विरुद्ध २ कसोटी आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळली होती. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. पहिला सामना झिम्बाब्वेने १० विकेट्सने जिंकला होता. तर अफगाणिस्तातने दुसरा सामना ६ विकेट्सने जिंकला होका. तसेच टी२० मालिका मात्र अफगाणिस्तानने जिंकली होती. पण, या दरम्यान असगर अफगाणच्या काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
कर्णधार म्हणून अफगाणची कामगिरी
असगर अफगाणने आत्तापर्यंत वनडेत अफगाणिस्तानचे ५९ सामन्यांत नेतृत्व केले आहे, त्यातील ३४ सामन्यात संघाला विजय मिळाला आहे, तर२१ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच कसोटीत त्याने ४ सामन्यांत नेतृत्व केले असून २ सामने जिंकले आहेत आणि २ सामने पराभूत झाले आहेत.
याशिवाय त्याने अफगाणिस्तानचे ५२ टी२० सामन्यांतही नेतृत्व केले आहे. यातील ४२ सामन्यांत संघाला विजय मिळाला आहे, तर ९ सामन्यांत पराभव स्विकारला आहे. अफगाणिस्तानने आत्तापर्यंत केलेल्या प्रगतीमध्ये अफगाणचे योगदान मोठे राहिले आहे.
हशमतुल्लाह शाहिदीबद्दल थोडेसे
अफगाणिस्तानच्या कसोटी आणि वनडे संघाच्या नेतृत्वपदी निवड झालेल्या शाहिदीने आत्तापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३५३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका द्विशतकाचा समावेश आहे. कसोटीत द्विशतक करणारा तो पहिला आणि सध्यातरी एकमेव अफगाणिस्तानचा खेळाडू आहे.
तसेच त्याने ४१ वनडे सामन्यांत ११५४ धावा केल्या आहेत. यात १० अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्याने ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून यात त्याला केवळ १ धाव करता आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आता लक्ष्य टेस्ट चॅम्पियनशीप! भारतीय संघ क्वारंटाईनदरम्यान देखील घेतोय प्रचंड मेहनत, व्हिडिओ व्हायरल
WTC Final: ‘या’ कारणामुळे न्यूझीलंड भारतीय संघाला ठरु शकतो वरचढ, माजी भारतीय कर्णधाराने मांडले मत






