ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात ८ डिसेंबरपासून सुरू झालेल्या ऍशेस मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. द गॅबा स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (११ डिसेंबर) ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत ५ सामन्यांच्या ऍशेस मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडला ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ २० धावांचे लक्ष्य ठेवण्यात यश मिळाले होते. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ५.१ षटकांत १ विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मार्कस हॅरिस ९ धावांवर नाबाद राहिला, तर ऍलेक्स कॅरेने ९ धावांवर आपली विकेट गमावली होती. ही एकमेव विकेट ऑली रॉबिन्सनने घेतली.
रुट-मलानच्या अर्धशतकांनंतरही इंग्लंडचा डाव कोलमडला
तत्पूर्वी तिसऱ्या दिवशी इंग्लंडने खरंतर चांगली झुंज दिली होती. जो रुट आणि डेविड मलान अर्धशतकं करून नाबाद होते. मात्र, चौथ्या दिवशी या दोघांचीही विकेट झटपट गेल्या. त्यानंतर मात्र, इंग्लंडचा संघ डाव सावरू शकला नाही. रुटने या डावात सर्वाधिक ८९ धावा केल्या. १६५ चेंडूत त्याने ही खेळी करताना १० चौकार मारले. तसेच मलानने १९५ चेंडूत ८२ धावांची खेळी करताना १० चौकार मारले. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली.
या दोघांव्यतिरिक्त इंग्लंडकडून दुसऱ्या डावात एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे, इंग्लंडचा दुसरा डाव १०३ षटकात २९७ धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावातील २७८ धावांच्या पिछाडीमुळे ऑस्ट्रेलियाला केवळ २० धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात नॅथन लायनची फिरकीने कमाल केली. त्याने ३४ षटकात ९१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय कॅमेरॉन ग्रीन आणि कर्णधार पॅट कमिन्सने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी १ विकेट घेतली.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला मिळाली होती मोठी आघाडी
त्याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय त्यांच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडचा पहिला डाव केवळ १४७ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून जॉस बटलर (३९) आणि ऑली पोप (३५) या दोघांनाच ३० धावांचा टप्पा ओलांडता आला. या डावात ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, त्याचबरोबर ग्रीनला १ विकेट मिळाली.
यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेविड वॉर्नर याने आपल्या फलंदाजीतील लय कायम ठेवताना ९४ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय मार्नस लॅब्यूशेनने देखील ७४ धावांची अर्धशतकी खेळी केली. पण, ऑस्ट्रेलियाच्या या डावात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते ट्रेविस हेड याच्या दिडशतकी खेळीने. त्याने आक्रमक खेळ करताना १४८ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांसह १५२ धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या डावात सर्वबाद ४२५ धावा करता आल्या आणि २७८ धावांची भक्कम आघाडी मिळवता आली.
इंग्लंडकडून पहिल्या डावात मार्क वूड आणि ऑली रॉबिन्सनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर ख्रिस वोक्सने २ विकेट्स घेतल्या, तर जॅक लीच आणि जो रुटने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
कपिल देव यांना भारतरत्न देण्याची मागणी; माजी खेळाडूने घेतला पुरस्कार
भारताच्या ऑलिम्पिक अपेक्षांना बसणार हादरा? ‘हे’ खेळ हटविण्याची तयारी सुरू
भारतीय महिला संघातही होणार नेतृत्वबदल?