---Advertisement---

Ashes: ऑस्ट्रेलियाच्या तोंडून विजयाचा घास हिसकावत इंग्लंडने अनिर्णित राखली ‘थरारक’ सिडनी कसोटी

On: रविवार, जानेवारी 9, 2022 4:02 PM
Stuart-Broad-James-Anderson
---Advertisement---

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला आहे. अखेरच्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी पूर्ण प्रयत्न केले होते, मात्र इंग्लंड क्रिकेटपटूंनी शेवटपर्यंत चिवट झुंज देत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. त्यामुळे आता मालिकेत ऑस्ट्रेलिया ३-० अशा विजयी आघाडीवर आहे. 

अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५८ धावांची गरज होती. तसेच ऑस्ट्रेलियाला १० विकेट्स घेण्याची गरज होती. त्यामुळे दोन्ही संघ सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करत होते. इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच संथ खेळ करण्यास सुरुवात केली. मात्र, तरीही पहिल्या सत्रात इंग्लंडने ३ विकेट्स गमावल्या. हसीब हमीद ९ धावांवर आणि डेव्हिड मलान ४ धावांवर बाद झाला. पण, जॅक क्रॉलीने १०० चेंडूत ७७ धावांची चांगली खेळी केली. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या सत्रात १०० धावांचा टप्पा पार केला होता.

यानंतरही जो रुट (२४), बेन स्टोक्स (६०) आणि जॉनी बेअरस्टो (४१) यांनी देखील चांगली झुंज देत इंग्लंड सामना पराभूत होणार नाही याची काळजी घेतली. मात्र, अखेरच्या सत्रात इंग्लंडने ५ विकेट्स गमावल्यामुळे सामन्यात रंगत आली होती. त्यातच अखेरच्या २ विकेट्सची ऑस्ट्रेलियाला गरज असताना जॅक लीच आणि स्टुअर्ट ब्रॉडने ८ व्या विकेटसाठी ५२ चेंडूंचा सामना करताना ३३ धावांची भागीदारी केली.

पण अखेरचे १३ चेंडू बाकी असताना स्टीव्ह स्मिथने लीचला २६ धावांवर बाद केले. त्यामुळे अखेरची विकेट घेत ऑस्ट्रेलिया सामना जिंकणार का की इंग्लंडचे ब्रॉड आणि जेम्स अँडरसन ही वेगवान गोलंदाजांची जोडगोळी बॅटने इंग्लंडचा पराभव टाळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर ब्रॉड आणि अँडरसनने अखेरची दोन्ही षटके खेळून काढली आणि सामना अनिर्णित राखला. विशेष म्हणजे अँडरसनने स्टीव्ह स्मिथने गोलंदाजी केलेले अखेरचे संपूर्ण षटक खेळले होते. मात्र, स्मिथला त्याची विकेट घेता आली नाही.

इंग्लंडने ३८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात १०२ षटकात ९ बाद २७० धावा केल्या. ब्रॉड ३५ चेंडूत ८ धावांवर आणि अँडरसन ६ चेंडूत शुन्य धावेवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने ३ विकेट्स घेतल्या, तसेच कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. याशिवाय स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

https://www.youtube.com/watch?v=jZEWgXY2Faw

सामन्यावर एक दृष्टीक्षेप
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ४१६ धावांवर पहिला डाव घोषित केला होता. ऑस्ट्रेलियाकडून या डावात उस्मान ख्वाजाने १३७ धावांची शतकी खेळी केली. तसेच स्टीव्ह स्मिथने ६७ धावा केल्या. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव ७९.१ षटकात २९४ धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे त्यांना १२२ धावांची पिछाडी स्विकारावी लागली. इंग्लंडकडून पहिल्या डावात जॉनी बेअरस्टोने शतकी खेळी केली. त्याने १५८ चेंडूत ११३ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त बेन स्टोक्सने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच मार्क वूडने तळात ३९ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

अधिक वाचा – ऍशेस मालिका तर गमावलीच, पण इंग्लंडने ‘या’ नकोशा विक्रमात केली बांगलादेशची बरोबरी

ऑस्ट्रेलियाने त्यांचा दुसरा डाव ६८.५ षटाकात ६ बाद २६५ धावांवर घोषित केला होता. तसेच पहिल्या डावातील १२२ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर ३८८ धावांचे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात देखील उस्मान ख्वाजाने शतकी खेळी केली. त्याने १३८ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि २ षटकर मारले.

ख्वाजाव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात कॅमेरॉन ग्रीनने देखील अर्धशतकी खेळी केली. त्याने १२२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७४ धावा केल्या. तसेच मार्कस हॅरिस (२७), मार्नस लॅब्यूशेन (२९) आणि स्टीव्ह स्मिथ (२३) यांनी २० धावांचा टप्पा ओलांडला होता. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

निवृत्ती घेण्यापूर्वी खेळाडूंना बोर्डाला द्यावी लागणार नोटीस, वैतागलेल्या श्रीलंका क्रिकटचे कडक नियम

सुदैव म्हणतात ते हेच! कॅच सुटला, षटकारही नाही मारला अन् नो बॉलही नाही, तरी फलंदाजाला मिळाल्या ७ धावा

सनरायझर्स हैदराबादसोबतच्या संबंधाबाबत वॉर्नरने सोडले मौन; म्हणाला, ‘जर कर्णधाराला बाहेर करत असाल तर..’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---