आशिया चषक २०२२ पूर्वी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेत गोलंदाजाने भारताकडून उल्लेखनीय प्रदर्शन करत भारताच्या संघ निवडकर्त्यांना सणसणीत चपराक लगावली आहे. कारण या गोलंदाजाला आशिया चषकासाठी दुर्लक्षित केले गेले आहे. हा गोलंदाज आणखी कोण नसून शार्दुल ठाकूर आहे.
येत्या २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत आशिया चषक २०२२ चा (Asia Cup 2022) हंगाम सुरू होणार आहे. भारतीय संघ २८ ऑगस्टपासून पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) त्यांच्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात करेल. परंतु या स्पर्धेसाठी भारताच्या निवड समितीने ३० वर्षीय वेगवान गोलंदाज शार्दुलला (Shardul Thakur) संघात निवडलेले नाही, ज्याचे नुकसान भारतीय संघाला होऊ शकते.
शार्दुल सध्या खूपच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या (India vs Zimbabwe) दुसऱ्या वनडे सामन्यातून संघात पुनरागमन करत आपली जुनी लय दाखवली आहे. आपल्या धारदार गोलंदाजीने विरोधी संघाचा घाम काढत त्याने त्यांना १६१ धावांवरच सर्वबाद केले आहे. ७ षटके गोलंदाजी करताना त्याने ३८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या आहेत. पहिला वनडे सामना गाजवणाऱ्या दीपक चाहरच्या जागी शार्दुलला संघात सहभागी केले गेले होते. अशात त्याने दमदार प्रदर्शन करत संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य ठरवला.
आशिया चषकातही शार्दुल हीच लय दाखवत भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करू शकला असता. भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीत शार्दुलमुळे वेगवान गोलंदाजी विभागाला बळ मिळाले असते.
आशिया चषक २०२२साठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान





