---Advertisement---

जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत 9 तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ

Ravi-Shastri
---Advertisement---

सिडनी कसोटी म्हटलं की, क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. क्रिकेटच्या अनेक प्रसिद्ध मैदानांपैकी हे एक मैदान. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आत्तापर्यंत अनेकदा खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तरी, सिडनीतील सामना म्हटलं की अनेकांना हमखास आठवतात ते रवी शास्त्री. सिडनीचे हे मैदान भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी फार खास आहे. कारण याच मैदानात त्यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावांची खेळी केली होती.

शास्त्रींनी 32 वर्षांपूर्वी 5 जानेवारी 1992 ला सिडनी कसोटीत 206 धावांची खेळी केली होती. हा सामना 2 ते 6 जानेवारी दरम्यान खेळला गेला. या सामन्यात भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला.

ऑस्ट्रेलियाने पहिला दिवस खेळून काढला. मात्र दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ 313 धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्याकडून डेविड बून यांनी 129 धावांची शतकी खेळी साकारली होती. तर मार्क टेलरने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. अन्य कोणत्याही फलंदाजाला खास काही करता आले नव्हते. भारताकडून कपिल देव, मनोज प्रभाकर आणि या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या सुब्रतो बॅनर्जी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या.

सचिन-शास्त्रींची दिडशतकी भागीदारी –
ऑस्ट्रेलियाला 313 धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारताकडून रवी शास्त्री आणि नवज्योत सिंग सिद्धू यांची सलामी जोडी फलंदाजीला उतरली. मात्र सिद्धू शुन्यावरच बाद झाले. मात्र त्यानंतर संजय मांजरेकर आणि शास्त्री यांची जोडी जमली होती. पण मर्व्ह ह्यूजेसने मांजरेकरांना 34 धावांवर बाद केले. दुसऱ्या दिवसाखेर शास्त्रींचे अर्धशतक झाले होते. ते दिलीप वेंगसरकर यांच्यासह नाबाद खेळत होते. या सामन्यात सातत्याने पावसाचा व्यत्ययही आला होता. तिसऱ्या दिवशीही पावसाने बराच वेळ घेतला. त्यामुळे शास्त्रींचे शतक तिसऱ्या दिवशी पूर्ण झाले नाही. ते 95 धावांवर नाबाद राहिले. पण त्याच दिवशी 66 धावांवर असताना त्यांचा झेल पहिलाच सामना खेळणाऱ्या शेन वॉर्नने स्वत:च्याच गोलंदाजीवर सोडला होता, त्यामुळे शास्त्रींना जीवनदान मिळाले. ज्याचा त्यांनी पुढे पुरेपूर वापर केला.

अखेर 5 जानेवारी 1992 ला सामन्याच्या चौथ्या दिवशी शास्त्रींचे शतक पूर्ण झाले. पण या दिवशी पहिल्याच सत्रात क्रेग मॅकडरमॉटने वेंगसरकर (54) आणि अझरुद्दीनला (4) एकाच षटकात बाद केले. पण त्यानंतर शास्त्रींना साथ देण्यासाठी मैदानात उतरला तो सचिन तेंडुलकर. त्याने शास्त्रींना भक्कम साथ दिली. एकीकडे सचिन काहीसा आक्रमक खेळत असताना शास्त्रींनी दुसरी बाजू भक्कम सांभाळली. या दोघांनी मिळून 196 धावांची भागीदारी रचली होती.

वॉर्नची पहिली विकेट –
शास्त्रींनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची दमछाक केली असतानाच अखेर युवा वॉर्नने त्यांना बाद करत कारकिर्दीतील पहिली कसोटी विकेट मिळवली. याबरोबरच शास्त्रींच्या जवळपास साडेनऊ तास चाललेल्या फलंदाजीला लगाम लागला. शास्त्री 477 चेंडूत 206 धावांची खेळी करुन बाद झाले. या खेळीत त्यांनी 2 षटकार आणि 17 चौकार मारले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियातच द्विशतक करणारे शास्त्री पहिले भारतीय ठरले होते. त्यांच्या या खेळीने आणि पुढे सचिनने केलेल्या नाबाद 148 धावांच्या खेळीमुळे भारताने त्या डावात 483 धावसंख्या उभारली आणि 170 धावांची आघाडी घेतली होती.

https://twitter.com/cricketcomau/status/1346437542124675073

शास्त्रींची गोलंदाजीतही कमाल…
या सामन्यात जरी पावसाने बराच व्यत्यय आणला असला तरी सामन्याच्या शेवटच्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था दुसऱ्या डावात 8 बाद 173 धावा अशी झाली होती. त्या सामन्यात भारताचे पूर्णपणे वर्चस्व राहिले होते. विशेष म्हणजे शास्त्रींनी द्विशतकी खेळी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना 25 षटकात 45 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी त्यांनी 8 षटके निर्धाव टाकली होती. शास्त्रींच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या वनडेला बावन्न वर्षे पूर्ण! वाचा ‘त्या’ ऐतिहासिक सामन्याबाबत काही रंजक गोष्टी
व्हिडिओ पाहा – टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं

टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं | HARBHAJAN FINED IN NEW ZEALAND

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---