गोवा : इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) साखळी फेरीत बाम्बोलीन येथील ऍथलेटिक्स स्टेडियमवर गुरुवारी बंगलोर एफसी आणि एटीके मोहन बागान यांच्यातील लढतीत अर्धा डझन गोल झाले. त्यात मोहन बागानने प्रतिस्पर्ध्यांना ३-३ असे बरोबरीत रोखले.
पहिल्या सत्रात चार तसेच दुसऱ्या सत्रात दोन गोलांची नोंद झाली. मध्यंतराला २-२ अशी बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात मोहन बागानने आक्रमण अधिक तेज केले. ५२व्या मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जॉनी कौकाने चांगला प्रयत्न केला. मात्र, चेंडू नीट कनेक्ट न झाल्याने गोलपोस्टवरून गेला. सहा मिनिटांनी पेनल्टी क्षेत्रात बेंगलोरच्या खेळाडूंकडून फाउल झाल्याने रेफ्रींनी पेनल्टी बहाल केली. त्यावर रॉय कृष्णाने मोहन बागानला आघाडीवर नेले. परंतु, पुन्हा एकदा पाठशिवणीचा खेळ पाहायला मिळाला. ७२व्या मिनिटाला रोशन नाओरेमच्या पासवर प्रिन्स इबाराने चेंडू गोलजाळ्यात ढकलला. यावेळी प्रतिस्पर्धी गोलकीपर अमरिंदर सिंगला त्याने अजिबात संधी दिली नाही. त्यामुळे सामना ३-३ असा बरोबरीत आला.
शेवटच्या १८ मिनिटांत दोन्ही संघांनी राखीव खेळाडूंना अधिक संधी दिली. त्यातच ७९व्या मिनिटाला बेंगलोरने काउंटर अटॅक करताना अजित कामराजने उजव्या बाजूने इबाराला सुरेख पास दिला. मात्र, त्याचा फटका गोलजाळ्याबाहेर गेला. शेवटच्या मिनिटांमध्ये दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ केला तरी बरोबरीची कोंडी फुटली नाही.
त्याआधी, पूर्वार्धात चार गोल झाले. त्यापैकी तीन गोल १३ मिनिटांच्या फरकाने लगावले गेले. १३ व्या मिनिटाला सुभाशिष बोसने बागानचे खाते उघडले. ह्युगो बॉमॉसने चेंडूवर ताबा मिळवत उजव्या बाजूने सुभाशिषला पास दिला. त्याने चपळता दाखवत अप्रतिम गोल केला. सुरुवातीला आघाडी घेण्याचा बागानचा आनंद केवळ पाच मिनिटे टिकला. १८ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर क्लीटन सिल्वाने बेंगलोरला बरोबरी साधून दिली. पेनल्टी क्षेत्रात लिस्टन कॉलॅकोने फॉरवर्ड सिल्वाला चुकीच्या पद्धतीने पाडल्याने रेफ्रींनी बेंगलोरला पेनल्टी बहाल केली.
२६ व्या मिनिटाला दानिश फारूखने त्यात भर घातली. मात्र, या गोलातही क्लीटनचा मोठा वाटा होता. बंगलोरच्या गोलक्षेत्रात त्याने दानिशला अचूक पास दिला. त्यावर त्याने हेडरने चेंडूला गोलपोस्टची दिशा दाखवली. फारूखने मारलेला चेंडू जाळीला लागून गोलपोस्टमध्ये विसावला. या गोलमुळे बंगलोरकडे २-१ अशी आघाडी होती. मात्र, मध्यंतराला १२ मिनिटे शिल्लक असताना ह्युगो बॉमॉसने बागानला २-२ अशा बरोबरीत आणले.
एटीके मोहन बागानची ही सलग दुसरी बरोबरी आहे. या बरोबरीनंतर ६ सामन्यांतून ८ गुण झाले असून गुणतालिकेत सहाव्या स्थानी कायम आहेत. गुरुवारच्या बरोबरीमुळे माजी विजेत्या बेंगलोरची सलग तीन पराभवांची मालिका खंडित झाली. बंगलोरच्या खात्यात ५ गुण असून ते नवव्या स्थानी कायम आहेत.
निकाल : बंगलोर एफसी – ३ (क्लीटन सिल्वा १८व्या मिनिटाला-पेनल्टी, दानिश फारूख २६व्या मिनिटाला, प्रिन्स इबारा, ७२व्या मिनिटाला) वि. एटीके मोहन बागान – ३ (सुभाशिष बोस १८व्या मिनिटाला, ह्युगो बॉमॉस ३८व्या मिनिटाला, जॉनी कौका ५८व्या मिनिटाला-पेनल्टी )