भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सिडनी येथे खेळला गेला. आयपीएल 2020 मध्ये एकाच संघाकडून खेळलेले दोन्ही देशाचे खेळाडू या सामन्यात एकमेकांच्या विरुद्ध खेळत होते. या वनडे मालिकेचा भाग असलेले बहुतांश खेळाडू नुकत्याच युएई येथे झालेल्या आयपीएलमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू फ्लॉप ठरले तर बर्याच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती.
आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात चमकदार कामगिरी केली. याच कारणामुळे या खेळाडूंची सर्वाधिक चर्चा होतेयं. या लेखात आपण ऑस्ट्रेलियाच्या अशाच तीन खेळाडूंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1) ग्लेन मॅक्सवेल
आयपीएल 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल पूर्णपणे अपयशी ठरला. 10 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळालेल्या मॅक्सवेलने संपूर्ण स्पर्धेत 13 सामने खेळले. ज्यामध्ये त्याने फक्त 108 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 15 होती. त्याने या हंगामात एकही षटकार ठोकला नाही. याउलट भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने अवघ्या 19 चेंडूत 45 धावा केल्या. त्याने त्याच्या डावात तीन षटकार आणि पाच चौकार ठोकले. एवढेच नव्हे, तर त्याचा स्ट्राइक रेट 236 होता.
2) स्टीव्ह स्मिथ
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने 14 सामन्यांत तीन अर्धशतकांच्या मदतीने 311 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 131 होता. पण भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने आयपीएलमध्ये केलेल्या खेळीच्या तुलनेत अधिक चांगल्या शैलीत फलंदाजी केली. स्मिथने अवघ्या 66 चेंडूत 105 धावा केल्या. यामध्ये त्याने 11 चौकार आणि 4 षटकार लगावले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट जवळपास 160 होता.
3) ऍरॉन फिंच
आयपीएल 2020 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये खेळणार्या फिंचनेही लीगमध्ये काही खास कामगिरी केली नाही. त्याने एक अर्धशतकाच्या मदतीने 12 सामन्यात 268 धावा केल्या. याउलट भारताविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात फिंचने शतक झळकावले. त्याने 124 चेंडूत 114 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीशांतचे मैदानावर पुनरागमन! ‘या’ टी-२० स्पर्धेत घेणार सहभाग
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला
बेयरस्टोचे तुफानी अर्धशतक; इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात दणदणीत विजय