आयपीएल २०२० नंतर आता भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांच्या तयारीमध्ये पूर्णपणे व्यस्त आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ वनडे सामन्यांची मालिका २७ नोव्हेंबरपासून सुरू होईल. मालिकेतील पहिला सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाईल. दुसरा सामनाही याच मैदानावर होईल. तिसरा आणि अखेरचा सामना २ डिसेंबर रोजी कॅनबेरा येथे संपन्न होईल.
मालिकेसाठी घोषित झालेल्या भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले, तर यावेळचा भारतीय संघ अत्यंत संतुलित आहे. भारतीय संघाच्या फलंदाजी इतकीच गोलंदाजी देखील सुदृढ बनली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर सर्वांची नजर असेल. मात्र, कसोटी मालिकेच्या कारणास्तव, त्यांना काही सामन्यात विश्रांतीही दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत उर्वरित गोलंदाजांवर अधिक जबाबदारी असेल. भारतीय संघात आणखी बरेच चांगले गोलंदाज आहेत, जे वनडे मालिकेत आपला प्रभाव सोडू शकतात.
आज आपण, भारतीय संघातील अशा तीन गोलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत, जे आगामी वनडे मालिकेत सर्वाधिक बळी घेऊ शकतात.
१. नवदीप सैनी
आगामी वनडे मालिकेत सर्वांची नजर युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीवर असेल. आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर, तो ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना त्याने सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सविरूद्ध जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावलेला असेल. संपूर्ण आयपीएलमध्ये विराट कोहलीने त्याच्यावर बेंगलोरच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली होती.
सैनी धारदार यॉर्कर टाकण्यासाठी ओळखला जातो. भारतीय संघाकडून सातत्याने खेळत असल्याने, त्याच्या गोलंदाजीत सुधारणा होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक बळी घेण्याची क्षमता नवदीप सैनीमध्ये नक्कीच आहे.
२. जसप्रीत बुमराह
सध्या भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहला वनडे मालिकेतील सर्व सामने खेळायला मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, तो इतका दर्जेदार खेळाडू आहे की, एक-दोन सामन्यात तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनू शकतो. त्याच्याकडे एकाच सामन्यात पाच-सहा बळी मिळवण्याची क्षमता आहे. बुमराह आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा गाजवू शकतो.
३. युझवेंद्र चहल
भारताचा प्रमुख फिरकीपटू युझवेंद्र चहल हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत खूप महत्वाचा ठरू शकतो. यापूर्वी, बर्याच वेळा आपल्या फिरकी गोलंदाजीद्वारे त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्रस्त केले आहे. यावेळच्या वनडे मालिकेत देखील तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
चहल धोका पत्करून गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना चौकार-षटकार मारण्यासाठी प्रवृत्त करत असतो. ऑस्ट्रेलियातील मैदाने मोठी असल्याने, चहल आगामी मालिकेत सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरल्यास आश्चर्य वाटायला नको.
ट्रेंडिंग लेख-
श्वास रोखून धरा! आगामी वनडे मालिकेत ‘हे’ तीन भारतीय पाडू शकतात धावांचा पाऊस
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका वनडेत सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय फलंदाज, दुसरे नाव अनपेक्षित
‘या’ ३ भारतीय शिलेदारांचा असू शकतो अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा; दुसरे नाव आश्चर्यकारक
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! रोहित आणि ईशांत शर्मा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून बाहेर?
टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश