सिडनी| ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या ४ सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी ही कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (७ जानेवारी) सुरु होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत भक्कम आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा इरादा असणार आहे.
कारण या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता, त्यामुळे ही मालिका सध्या १-१ अशा बरोबरीच्या स्थितीत आहे. त्यामुळे तिसरा सामना जो संघ जिंकेल, त्या संघावरील मालिका पराभवाचे संकटही टळेल. तसेच जर हा सामना अनिर्णित राहिला तर मालिकेतील चौथा सामना निर्णायक असेल.
अंतिम ११ संघात होणार बदल –
तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम ११ जणांच्या संघात बदल होणार हे निश्चित आहे. कारण दुसऱ्या सामन्यात भारताकडून खेळलेला उमेश यादव दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी शार्दुल ठाकूर किंवा नवदीप सैनी यांना संघात स्थान मिळू शकते. याबरोबरच रोहित शर्माला उपकर्णधारपद देण्यात आल्याने तो या सामन्यात खेळणे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे कदाचित सध्या खराब फॉर्मशी झगडत असलेल्या मयंक अगरवालला वगळले जाऊ शकते.
तसेच ऑस्ट्रेलियन संघाचा विचार करायचा झाल्यास डेविड वॉर्नरचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच विल पुकोव्हस्कीही कसोटी पदार्पण करण्यास सज्ज आहे. याबरोबरच दुसऱ्या सामन्यात खेळलेल्या जो बर्न्सला तिसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे त्याच्याजागेवर वॉर्नर किंवा पुकोव्हस्की यांच्यापैकी एकाची वर्णी लागणे निश्चित आहे.
सिडनी सामन्यांचा इतिहास –
सिडनीमध्ये आत्तापर्यंत भारत-ऑस्ट्रेलिया संघ १२ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यातील ५ वेळेस ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर १ वेळा भारताने विजय मिळवला आहे. तसेच ६ वेळा सामने अनिर्णित राहिले आहेत.
कधी, कुठे आणि केव्हा होणार सामना घ्या जाणून –
१. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा कसोटी सामना केव्हा होणार?
– ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा कसोटी सामना ७ ते ११ जानेवारी दरम्यान खेळला जाणार आहे.
२. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा कसोटी सामना कुठे खेळवला जाणार ?
– ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी येथे खेळवला जाईल.
३. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा कसोटी सामना किती वाजता सुरु होणार ?
– ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५ वाजता सुरु होईल. त्याआधी पहाटे ४.३० वाजता नाणेफेक होईल.
४. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी नेटवर्कच्या सोनी सिक्स, सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 या चॅनेलवर पाहता येईल.
५. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन Sony Liv app वर पाहाता येईल.
संभाव्य संघ –
भारत –
रोहित शर्मा (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत(यष्टीरक्षक), हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.
ऑस्ट्रेलिया –
डेविड वॉर्नर, विल पुकोव्हस्की, मार्नस लॅब्यूशाने, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, टीम पेन(कर्णधार/यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, जोस हेजलवूड, मिशेल स्टार्क, नॅथन लायन.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
काय सांगता! आयपीएलमधून माघार घेतलेला डेल स्टेन खेळणार ‘या’ टी२० टूर्नामेंटमध्ये
रणजी ट्रॉफीसाठी उत्तर प्रदेशच्या संभाव्य संघाची घोषणा; सुरेश रैनाला मात्र स्थान नाही