ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर सुरु असून मंगळवारी(१९ जानेवारी) या सामन्याचा शेवटचा दिवस आहे. हा सामना सध्या अशा स्थितीत आहे की कोणताही निकाल लागू शकते. कारण पाचव्या दिवशी भारतासमोर ३२४ धावा करण्याचे आव्हान आहे, तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी भारतीय संघाला सर्वबाद करावे लागणार आहे. त्यातच पावसाची शक्यता असल्याने हा सामना अनिर्णितही राहू शकतो.
भारताला इतिहास रचण्याची संधी –
या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताने जर विजय मिळवला, तर ऑस्ट्रेलियाची गेल्या ३ दशकातील ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याची मालिका खंडीत होईल. साल १९८८ पासून ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. आत्तापर्यंत सन १९८८ नंतर ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन येथे खेळलेल्या ३१ सामन्यांपैकी २४ सामन्यांमध्ये विजय मिळवले असून ७ सामने अनिर्णित राहिले आहेत. सध्या भारताविरुद्ध सुरु असलेला ३२ वा सामना आहे.
ऑस्ट्रेलियाने या मैदानावर शेवटचा पराभव १९८८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध स्विकारला होता. त्यावेळी वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला ९ विकेट्सने पराभूत केले होते.
तसेच आत्तापर्यंत ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या सामन्यांचा विचार करायचा झाल्यास त्यांनी या मैदानावर ६३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ४० सामन्यात विजय मिळवला आहे. तर ८ सामन्यात पराभव स्विकारला आहे. हे आठही सामने सन १९८८ च्या आधीचे आहेत. तसेच ब्रिस्बेन येथे झालेला १ सामना बरोबरीत सुटला आहे, तर १३ सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारताने आत्तापर्यंत जिंकली नाही ब्रिस्बेन कसोटी –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेन येथे आत्तापर्यंत ६ कसोटी सामने झाले आहेत. त्यातील १ सामना अनिर्णित राहिला आहे, तर ५ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. सध्या या दोन संघात सुरु असलेला सामना या मैदानातील ७ वा सामना आहे. त्यामुळे आता भारतीय संघ ब्रिस्बेनच्या मैदानावर पहिला विजय मिळवणार का हे पाहावे लागेल.
चौथ्या दिवसाखेर भारताच्या बिनबाद ४ धावा –
ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह भारताला ३२८ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरले. मात्र त्यांनी ११ चेंडू खेळल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला तेव्हा भारताने १.५ षटकात बिनबान ४ धावा केल्या होत्या. आता भारताला शेवटच्या दिवशी ३२४ धावांची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला भारताच्या सर्व १० विकेट्स घेण्याचे आव्हान आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा काय डोकं चालवलंय! चेंडू चमकवण्यासाठी मयंकने शार्दुलच्या हातावर घासला चेंडू, पाहा व्हिडिओ
शब्बास रे पठ्ठ्या! सिराजने पदार्पणाची मालिका खेळतानाच मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला….