ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघात दर दोन वर्षांनी होणाऱ्या ऍशेस मालिकेला ऐतिहासिक महत्त्व गेल्या अनेक वर्षांपासून प्राप्त झाले आहे. त्यामुळे ही या दोन संघांसाठी एक मानाची कसोटी मालिका मानली जाते. यंदा ही मालिका ऑस्ट्रेलियात वर्षाखेरीस सुरू होत आहे. मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी बुधवारी (१७ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे.
ख्वाजा, रिचर्डसनचे पुनरागमन
ऍशेस २०२१-२२ मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या १५ जणांच्या ऑस्ट्रेलियन संघात उस्मान ख्वाजा आणि झाय रिचर्डसन यांचे पुनरागमन झाले आहे. ख्वाजा ऑस्ट्रेलियाच्या अंतिम ११ जणांच्या संघात अखेरचे २०१९ साली इंग्लंड दौऱ्यात खेळला आहे. त्याची आणि रिचर्डसनची यंदाच्या शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय होती. त्याने ४०४ धावा काढल्या, तर रिचर्डसनने १६ विकेट्स घेतल्या.
याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या निवड समीतीचा प्रमुख जॉर्ज बेलीने संकेत दिले की मार्कस हॅरिस डेव्हिड वॉर्नरसह सलामीला फलंदाजी करेल. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीत ट्रेविस हेड, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅब्युशेन असे फलंदाज आहेत. याबरोबरच कॅमेरॉन ग्रीनला देखील संधी देण्यात आली असून गोलंदाजी फळीत पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क, मिशेल स्विप्सन, नॅथन लायन असे खेळाडू आहेत.
ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्त्व टिम पेनकडे कायम असून पॅट कमिन्स उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघाचीही घोषणा
ऑस्ट्रेलिया निवड समीतीने ऑस्ट्रेलिया अ संघाचीही घोषणा केली आहे. हा संघ आपल्या कसोटी संघाविरुद्ध ब्रिस्बेन येथे तीन दिवसीय अंतर्गत सराव सामना खेळेल. त्यानंतर इंग्लंड लायन्स (इंग्लंड अ) विरुद्ध ९ डिसेंबरपासून चार दिवसीय सामना खेळेल.
या ठिकाणी होणार ऍशेस मालिकेतील सामने
ऍशेस २०२१-२२ मालिकेला ८ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना १६ डिसेंबरपासून ऍडलेडला खेळला जाईल. तिसरा सामना बॉक्सिंग डे कसोटी असेल. या सामन्याला २६ डिसेंबरला मेलबर्न येथे सुरुवात होईल. यानंतर नव्या वर्षी ५ जानेवारीपासून सिडनीत चौथा कसोटी सामना खेळला जाईल. पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना पर्थला १४ जानेवारीपासून सुरू होईल.
ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया संघ –
टिम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्यूशेन, नॅथन लायन, मायकेल नेसर, झाय रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिशेल स्टार्क, मिशेल स्विप्सन, डेव्हिड वॉर्नर.
ऑस्ट्रेलिया अ संघ –
सीन ऍबॉट, ऍश्टन एगर, स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरी, हेन्री हंट, जोश इंग्लिस, निक मॅडिन्सन, मिशेल मार्श, मॅट रेनशॉ, मार्क स्टीकेटी, ब्राइस स्ट्रीट
ऍशेस २०२१-२२ मालिकेचे वेळापत्रक
८-१२ डिसेंबर २०२१ – पहिली कसोटी – द गॅबा, ब्रिस्बेन
१६-२० डिसेंबर २०२१ – दुसरी कसोटी – ऍडलेड ओव्हल
२६-३० डिसेंबर २०२१ – तिसरी कसोटी – मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड
५-९ जानेवारी २०२२ – चौथी कसोटी – सिडनी क्रिकेट ग्राऊंड
१४-१८ जानेवारी २०२२ – पाचवी कसोटी – पर्थ स्टेडियम
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माच्या नेतृत्वात काय असेल विराट कोहलीची भूमिका? ‘हिटमॅन’ने दिले उत्तर
‘वडिलांचे स्वप्न पूर्ण करतोय’ म्हणत सचिन तेंडूलकरने उचलला ६५० गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च