सध्या टी20 विश्वचषक 2024 चे सुपर 8 सामने खेळले जात आहेत. आतापर्यंत 8 सामने खेळले गेले असून फक्त चार सामने बाकी आहेत. मात्र अद्याप एकही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकलेला नाही किंवा कोणताही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही! अफगाणिस्ताननं रविवारी ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मोठा अपसेट केला. यामुळे ऑस्ट्रेलियासमोर अडचणी निर्माण झाल्या असून, आता त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सुपर 8 च्या गट 1 बद्दल बोलायचं झालं तर, या गटात भारतीय संघ 2 सामन्यांत 4 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 2 सामन्यांतून 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून अफगाणिस्तानचेही समान गुण आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट चांगला आहे. चौथ्या क्रमांकावर बांगलादेशचा संघ आहे, ज्यांनी दोन्ही सामने गमावले आहेत. मात्र, बांगलादेशचा संघ अद्याप अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही.
मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या संघावर या टी20 विश्वचषकातून बाहेर होण्याचा धोका आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 जून रोजी सेंट लुसिया येथे सामना होणार आहे. जर टीम इंडियानं हा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियन संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर पडेल, कारण त्यांचा नेट रन रेटही घसरेल. जर ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध हरला आणि अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत केलं, तर ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडतील.
जर आपण सुपर 8 च्या गट 2 बद्दल बोललो तर, येथेही अशीच परिस्थिती आहे. दक्षिण आफ्रिका दोन सामन्यांत दोन विजयांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज 2 सामन्यांत 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड आहे, ज्यांनी एका सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र, वेस्ट इंडिजचा नेट रन रेट चांगला आहे. अमेरिकेने दोन्ही सामने गमावले असून, ते चौथ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयाचे पडद्यामागील हिरो! ‘या’ दोन दिग्गजांनी केला संघाचा कायापालट
अफगाण गोलंदाजांचा करिष्मा! ऑस्ट्रेलियाला हरवून असा रचला इतिहास; कांगारुंसाठी सेमीफायनलचं समीकरण बिघडलं
अफगाणिस्ताननं घेतला मागील पराभवाचा बदला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर