आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने वनडे विश्वचषक सुपर लीग या स्पर्धेची घोषणा केली होती. 30 जुलै 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील अव्वल 7 संघ सन 2023 मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील.
असे असले तरी भारत 2023 विश्वचषकाचा यजमान देश असल्याने भारतीय संघ या मोठ्या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला आहे. तरी भारत वनडे विश्वचषक सुपर लीग या स्पर्धेतही सहभागी आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेनंतर या स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत.
भारताविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे 40 गुण झाले आहेत. यासह इंग्लंडला मागे टाकत आयसीसी वनडे सुपर लीगमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिले स्थान गाठले आहे.
इंग्लंड संघ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना जिंकत भारताने या चॅम्पियनशिपमध्ये गुणांचे खाते उघडले आहे. त्यामुळे भारतीय संघ 9 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. या स्पर्धेत सामना जिंकणाऱ्या संघाला 10 गुण दिले जातात. पण भारताने पहिल्या सामन्यात षटकांची गती कमी राखली असल्याने भारताचा 1 गुण कमी करण्यात आला आहे.
या लीगमध्ये सध्याच्या विश्वविजेत्या इंग्लंड संघाचे 30 गुण आहेत. या संघाने लीगच्या सुरुवातीच्या मालिकेत आयर्लंडचा 2-1 असा पराभव केला होता. पाकिस्तान संघाचे सध्या 20 गुण असून झिम्बाब्वेचे 10 गुण आहेत.
असे दिले जातात गुण –
या लीगमध्ये 13 संघ सहभागी आहेत आणि एकूण 156 सामने खेळले जातील. प्रत्येक संघ 8 प्रतिस्पर्धी संघांशी 3 सामन्यांच्या वनडे मालिका खेळेल. प्रत्येक संघाला 4 मालिका मायदेशात आणि 4 परदेशात खेळाव्या लागतील. म्हणजेच प्रत्येक संघ 24 सामने खेळेल. प्रत्येक संघाला सामना जिंकल्यानंतर 10 गुण मिळतील. तर सामना रद्द झाल्यास किंवा बरोबरीत सुटल्यास 5-5 गुण दिले जातील. तसेच जर सामना पराभूत झाला तर शुन्य गुण मिळतील. याबरोबर षटकांची गती कमी राखल्यास 1 गुण कमी केला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे ‘संपूर्ण वेळापत्रक’; पाहा कधी आणि कुठे होणार सामने
अखेर चहलची ‘सिग्नेचर पोझ’ रवींद्र जडेजालाही करावीच लागली, पाहा व्हिडिओ
भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यात मैदान गच्च भरणार, सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय