सध्या न्यूझीलंड येथे महिला क्रिकेट विश्वचषक (Womens Cricket World Cup 2022) खेळला जात आहे. या विश्वचषकात रविवारी (१३ मार्च) यजमान न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (NZvAUS) हा सामना खेळवण्यात आला. अटीतटीच्या लढतीची अपेक्षा असताना ऑस्ट्रेलियन महिला संघाने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवून गुणतालिकेत प्रथम स्थान गाठले. ऑस्ट्रेलियन महिला संघाने खेळाच्या तीनही विभागात न्यूझीलंडला पछाडत तब्बल १४१ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियन महिला संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या पुरुष संघांनाही न जमलेली अचाट कामगिरी करून दाखवली.
ऑस्ट्रेलियन संघाचा नवा विश्वविक्रम
ऑस्ट्रेलिया महिला संघाने या विजयासह न्यूझीलंड महिला संघावर वनडे क्रिकेटमधील १०० वा विजय संपादन केला. ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठी उपलब्धी आहे. कारण, यापूर्वी कोणत्या पुरुष संघाने ही अशी कामगिरी केली नव्हती. भारतीय पुरुष संघाने श्रीलंका संघावर आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये ९३ विजय मिळवले आहेत.
ऑस्ट्रेलिया संघाचा दणदणीत विजय
वेलिंग्टन येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एलिसा पेरी व तहिला मॅकग्रा यांनी अर्धशतके झळकावत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने संघाला नेले. अष्टपैलू ऍश्ले गार्डनर हिने अवघ्या १८ चेंडूंमध्ये तुफानी ४८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला २६९ धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. न्यूझीलंडसाठी ली तहूहूने सर्वाधिक तीन बळी मिळविले.
प्रत्युत्तरात यजमान संघ सुरुवातीपासूनच अडखळताना दिसला. मधल्या फळीतील फलंदाज ऍमी सेटरवेट हिने ४४ धावांची खेळी केली. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तहूहूने २३ धावांचे योगदान दिले. अखेरीस न्यूझीलंडचा संघ १२८ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियासाठी डेसी ब्राऊन हिने सर्वाधिक तीन बळी आपल्या नावे केले. गार्डनर व वेलिंग्टन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत तिला साथ दिली. तसेच ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी या सामन्यात तीन अप्रतिम झेल टिपले. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत भारतीय संघाला पछाडत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीला आतापर्यंत लाभलेत ६ कर्णधार, फाफ असेल सातवा; जाणून घ्या आतापर्यंतच्या कॅप्टन्सचे आकडे
वेस्ट इंडीजच्या दोन टी२० विश्वचषक विजयाचा साक्षीदार, ज्याला मिळाली नाही अपेक्षेप्रमाणे संधी
ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! वाचा मोहम्मद सिराजच्या संघर्षमय क्रिकेट प्रवासाची कहाणी