लाहोर| ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी करताना ३ सामन्यांची कसोटी मालिका १-० अशा फरकाने जिंकून मोठा विक्रम केला आहे. या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना अनिर्णित राहिला होता. तिसरा सामना शुक्रवारी (२५ मार्च) ऑस्ट्रेलियाने ११५ धावांनी जिंकला.
तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील तिसरा कसोटी सामना (3rd Test) गद्दाफी स्टेडियमवर २१ ते २५ मार्च दरम्यान पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर अखेरच्या डावात ३५१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात ९२.१ षटकात २३५ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना ११५ धावांनी जिंकण्याबरोबरच मालिकाही खिशात घातली.
पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रेलियाने मिळवलेला हा तिसरा कसोटी मालिका (Test Series) विजय ठरला आहे. यापूर्वी १९५९ साली रिची बेनॉड यांच्या नेतृत्त्वाखाली २-० अशा फरकाने, तर मार्क टेलर यांच्या नेतृत्त्वाखाली १९९८ साली १-० अशा फरकाने ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केले होते.
त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्त्वाखाली पाकिस्तानला त्यांच्या मायदेशात पराभवाचा धक्का दिला आहे. विशेष गोष्ट अशी की, ऑस्ट्रेलियाने १९९८ नंतर २४ वर्षांनी यंदा पाकिस्तान दौरा केला होता. म्हणजेच हा ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानमधील सलग दुसरा कसोटी मालिका विजय ठरला आहे.
पॅट कमिन्स आणि उस्मान ख्वाजा विजयाचे शिल्पकार
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंजादी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पहिल्या डावात १० बाद ३९१ धावा धावा केल्या. त्यांच्याकडून उस्मान ख्वाजा (९१), स्टीव्ह स्मिथ (५९), कॅमेरॉन ग्रीन (७९) आणि ऍलेक्स कॅरे (६७) यांनी अर्धशतके झळकावली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाहने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानचा पहिला डाव २६८ धावांवर संपूष्टात आला. पाकिस्तानकडून अजर अली (७८), अब्दुल्लाह शफिक (८१) आणि कर्णधार बाबर आझम (६७) यांनी अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने ५ विकेट्स आणि मिशेल स्टार्कने ४ विकेट्स घेतल्या. तसेच ऑस्ट्रेलियाने १२३ धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात देखील ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ३ बाद २२७ धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने शतकी खेळी केली. त्याने नाबाद १०४ धावा केल्या. तसेच डेव्हिड वॉर्नरने ५१ धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि नौमान अली यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील १२३ धावांच्या आघाडीसह पाकिस्तानला ३५१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इमाम उल हकने ७० आणि कर्णधार बाबर आझमने ५५ धावांची खेळी करत झुंज दिली. मात्र, त्यांना अन्य फलंदाजांकडून अपेक्षित अशी साथ मिळाली नाही. परिणामी पाकिस्तानचा दुसरा डाव २३५ धावांवरच संपुष्टात आला. या डावात ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने ५ आणि पॅट कमिन्सने ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरने थेट मैदानी पंचांशी घेतला पंगा; म्हणे, ‘मला रूल बूक दाखवा, मगच…’
‘तुम्ही चालत या’, जेव्हा आयपीएलदरम्यान शेन वॉर्नने रविंद्र जडेजा-युसूफ पठाणला सुनावलेली शिक्षा
धोनीने सीएसकेची कॅप्टन्सी सोडल्यानंतर व्हायरल होतोय ‘हा’ जुना व्हिडिओ, पाहा काय म्हणालाय ‘थाला’