बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेची सुरुवात २००८ मध्ये केली. पहिल्या हंगामाचे विजेतेपद राजस्थान रॉयल्स संघाने जिंकले होते. ऑस्ट्रेलियचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने ही कमाल केली होती. चेन्नई सुपर किंग्जचा नवीन कर्णधार रवींद्र जडेजा त्यावेळी राजस्थान संघाचा खेळाडू होता. त्यावेळी शेन वॉर्नकडून जडेजा आणि यूसुफ पठाणला एक अनोखी शिक्षा मिळाली होती.
आयपीएल स्पर्धा जेव्हा सुरू झाली, तेव्हा स्पर्धेत जगातील इतर देशांतील खेळाडूंसह पाकिस्तानचे खेळाडूही सहभाग घेऊ शकत होते. आता मात्र पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल खेळण्याची संधी नाही. पाकिस्तानचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज कमरान अकमल (Kamran Akmal) देखील राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत होता. आज दिग्गज शेन वॉर्न (Shane Warne) या जगात नाहीत. पण त्याच्याबद्दल अकमलने राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी असतानाचा एक मजेशीर किस्सा सांगितले आहे.
वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने जिंकलेल्या आयपीएल २००८ च्या विजेतेपदावर आधारीत माहितीपटात त्यावेळच्या संघातील सर्व खेळाडू बोलत आहेत. सर्वांनी शेन वॉर्नसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यादरम्यान कामरान अकमल शेन वॉर्नकडून रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि यूसुफ पठाण (Yusuf Pathan) यांना दिले गेलेल्या शिक्षेचा मजेशीर किस्सा सांगितला आहे.
स्पोर्ट्स यारी माहितीपटात बोलताना अकमल म्हणाला की, “यूसुफ पाठाण आणि रवींद्र जडेजा यांना सरावासाठी यायला थोडा उशीर झाला होता. त्यावेळी वॉर्न काहीच म्हणाला नाही. मला देखील उशीर झाला होता, पण मी थोड्याच वेळाआधी संघासोबत सहभागी झालो होतो. त्यामुळे त्याने माझ्यासोबत काहीच नाही केले. आम्ही सराव केला आणि स्टेडियममधून निघालो. जेव्हा आम्ही माघारी चाललो होतो, तेव्हा त्याने ड्राइव्हरला बस थांबवायला लावली. त्यानंतर वॉर्न या दोघांकडे वळला आणि म्हणाला, तुम्ही चालत या.” अकमलने सांगितलेल्या या किस्स्यावरून वॉर्नचे खेळाविषयीचे प्रेम आणि शिस्त स्पष्टपणे दिसते.
आयपीएलच कारकिर्दीच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी खेळणारा रवींद्र जडेजा आता चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनला आहे. एमएस धोनीने गुरुवारी (२४ मार्च) अचानक कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आणि जडेजावर ही जबाबदारी सोपवली. तर दुसरीकडे यूसुफ पठाणने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.