IPLक्रिकेटटॉप बातम्या

धोनीने सीएसकेची कॅप्टन्सी सोडल्यानंतर व्हायरल होतोय ‘हा’ जुना व्हिडिओ, पाहा काय म्हणालाय ‘थाला’

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या हंगामातील पहिला सामना ४ वेळची विजेती चेन्नई सुपर किंग्ज आणि २ वेळची विजेती कोलकाता नाईट रायडर्स या फ्रँचायझींमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी अचानक आपल्या नेतृत्त्वपदाचा राजीनामा देत संघाची सूत्रे अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या हाती सोपवली आहेत. यानंतर धोनीचा मागील हंगामातील अंतिम सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

धोनीने (MS Dhoni) चेन्नई संघाचे (Chennai Super Kings)  नेतृत्त्वपद सोडल्यानंतर त्याचा आयपीएल २०२१ मधील अंतिम सामन्यादरम्यानचा व्हिडिओ चर्चेत आला (MS Dhoni Old Video) आहे. हा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अंतिम सामना जिंकल्यानंतरच्या पोस्ट प्रेझेंटेशनमधील आहे.

व्हिडिओत समालोचक हर्षा भोगले धोनीला विचारताना दिसत आहेत की, “तू मागील कित्येक वर्षांपासून सीएसके फ्रँचायझीसाठी केलेल्या शानदार कामासाठी तुझे आभार. तू तुझ्यानंतर सीएसकेसाठी मोठा वारसा सोडून जाशील.”

हर्षा भोगलेंच्या भाष्यावर हसत उत्तर देताना धोनी म्हणतो की, “पण मी अजून सीएसकेचे नेतृत्त्वपद सोडलेले नाही.” हे सीएसकेसाठी कर्णधार धोनीने म्हटलेले शेवटचे शब्द होते. 

धोनीच्या या वक्तव्यानंतर असे अंदाज लावले जात होते की, आयपीएल २०२२ हा थालाचा शेवटचा आयपीएल हंगाम असेल. परंतु कोणालाही याचा अंदाज नव्हता की, धोनी त्याचा अखेरचा आयपीएल हंगाम कर्णधार म्हणून नव्हे तर केवळ खेळाडू म्हणून खेळेल.

धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर सीएसके फ्रँचायझी म्हणाली…
तत्पूर्वी धोनीने सीएसकेचे नेतृत्त्वपद सोडल्याची माहिती देताना सीएसकेने म्हटले आहे की, “धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्त्वपद दुसऱ्या खेळाडूकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने संघाची कमान सांभाळण्यासाठी जडेजासाठी निवड केली आहे. २०१२ पासून जडेजा सीएसकेचा महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. तो सीएसकेचे नेतृत्त्व करणारा केवळ तिसराच खेळाडू बनेल.”

जडेजापूर्वी धोनी आणि सुरेश रैना यांनी सीएसकेचे नेतृत्त्व केले आहे. धोनीच्या अनुपस्थित रैनाला काही सामन्यांमध्ये सीएसकेचे नेतृत्त्वपद सांभाळण्याची संधी मिळाली होती. मात्र तो सीएसकेचा पूर्णवेळ कर्णधार नव्हता. आता जडेजा मात्र सीएसकेचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून काम पाहिल.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२२च्या उद्घाटन सामन्यात भिडणार सीएसके अन् केकेआर, पाहा उभय संघांचे हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

‘कर्णधार’ धोनी युगाची अखेर! विराट, सेहवाग ते आयपीएल संघ, क्रिकेटविश्वातून अशा उमटल्यात प्रतिक्रिया

‘अपराजित’ ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक, बांंगलादेशला ५ विकेट्सने नमवत केला विजयी शेवट

Related Articles