बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळला जाईल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मार्क हॉवर्डबाबत एक बातमी समोर येत आहे. माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली आणि मार्क हॉवर्ड ॲडलेड कसोटीपूर्वी सिडनीमध्ये एका प्रमोशनल शूटमध्ये सहभागी झाले होते. येथे मार्क हॉवर्डला ब्रेट लीच्या चेंडूवर किपिंग करताना डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
झालं असं की, ब्रेट ली आणि मार्क हॉवर्ड एका शूटवर होते. हॉवर्ड त्याचा सहकारी समालोचक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्या गोलंदाजीवर विकेटकीपिंग करत होता. दरम्यान, ब्रेट लीचा एक चेंडू बेल्सचा लागला आणि बेल्स उडून हॉवर्डच्या डोक्याला लागल्या. यामुळे मोठी जखम होऊन हॉवर्ड याच्या डोक्यातून भळभळ रक्त वाहायला लागलं. यानंतर हॉवर्ड याला रॉयल प्रिन्स अल्फ्रेड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जिथे त्याच्या डोक्याला टाके पडले. सुदैवानं, बेल्स हॉवर्डच्या डोळ्याला लागली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. तो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीत समालोचनासाठी उपलब्ध असेल.
हॉवर्डच्या दुखापतीनंतर ब्रेट ली म्हणाला की, त्यानं आपल्या कारकिर्दीत कधीही बेल्सला इतक्या वेगानं उडताना पाहिलं नव्हतं. हॉवर्डच्या तब्येतीबद्दल बोलताना तो म्हणाला की हॉवर्ड दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल. मार्क हॉवर्डनं दुखापतीबद्दल बोलताना सांगितलं की, चेंडू डोळ्याला लागला नाही याचा आनंद आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या समालोचनासाठी मी उपस्थित राहणार असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. हॉवर्ड म्हणाले की मला आनंद आहे माझ्या डोळ्याला दुखापत झाली नाही.
हेही वाचा –
ॲडलेड दिवस-रात्र कसोटी भारतात किती वाजता सुरू होणार? प्रत्येक सत्राची वेळ जाणून घ्या
चॅम्पियन्स ट्रॉफीचा मार्ग मोकळा, या मैदानावर होणार भारत-पाकिस्तान सामना!
जसप्रीत बुमराह ॲडलेडमध्ये इतिहास रचणार! फक्त 3 विकेट घेताच मोडेल झहीर खानचा विक्रम






