क्रिकेटविश्वातील सर्वात मोठ्या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये भारत-पाकिस्तान यांची गणना होते. हे दोन्ही संघ फक्त मोठमोठ्या स्पर्धांमध्येच एकमेकांचा सामना करतात. जसे की, आयसीसी आणि आशिया चषक. सध्या श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ आशिया चषक 2023 स्पर्धेचे आयोजन करत आहेत. या स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने पार पडले असून या दोन्ही यजमान संघांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचा धक्का दिला आहे. अशात तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान 2 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने भारताला चेतावणी दिली आहे.
काय म्हणाला मॅथ्यू हेडन?
भारताच्या योजनेविषयी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) याने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधला. यावेळी त्याने सामन्याचा निकाल ठरवणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. हेडन म्हणाला, “भारतीय फलंदाजी क्रम पाकिस्तानचे वेगवान तिकडी गोलंदाज शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांच्याविरुद्ध खेळत आहे.”
भारताची योजना काय असावी?
हेडन म्हणाला, “हा सामना खूपच रंजक होणार आहे. क्रिकेटप्रेमींना रोमांचक सामना पाहायला मिळेल. तिन्ही वेगवेगळे आणि अनोखे गोलंदाज, ज्यांच्यासाठी भारताला वेगळ्या योजनांची गरज आहे. सर्वप्रथम कँडीच्या खेळपट्टीत उसळी खूप जास्त आहे. त्यामुळे हॅरिस रौफवर खास नजर असेल.”
आफ्रिदीविरुद्ध राहावे सावध
“रौफ वेगवान गोलंदाजी करत आतल्या बाजूने स्टम्पवर मारण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला शाहीन आफ्रिदी याच्याविरुद्ध जुन्या पद्धतीने खेळावे लागेल. मागील विश्वचषकात शाहीनने ज्याप्रकारच्या चेंडूने रोहित शर्माला बाद केले होते, आम्ही ते कधीही विसरणार नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल.”
सुरुवातीपासून बनवावा लागेल दबाव
“शाहीन सुरुवातीचे विकेट्स घेण्यात यशस्वी झाला आहे. अशात भारताला त्याच्याविरुद्ध खास योजना आखण्याची गरज पडेल. चेंडू स्विंग झाला, तर पहिली तीन षटके विशेष लक्ष द्यावे लागेल. नसीम शाहला सुरुवातीपासूनच दबावात ठेवावे आणि तुम्ही सामन्यात पुढे आहात, असे खेळावे लागेल.”
“नसीमविरुद्ध सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्याची गरज आहे. मात्र, मला वाटते भारताचाच विजय होईल. भारताकडे एक जबरदस्त फलंदाजी फळी आहे. यामधून ते चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील,” असेही पुढे बोलताना हेडन म्हणाला.
भारत-पाकिस्तान सामन्याची प्रतीक्षा
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेचा तिसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात खेळला जाणार आहे. हा सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या कँडी येथील पल्लेकेले मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3 वाजता सुरू होईल. या सामन्याची सर्व क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा लागली आहे. (australian former cricketer matthew hayden suggest team india before high voltage match ind vs pak)
हेही वाचाच-
‘आमच्याकडे शाहीन, नसीम आणि हॅरिस नाहीत, पण…’, पाकविरुद्धच्या मॅचपूर्वी रोहितच्या विधानाची सर्वत्र चर्चा
सलामीवीर म्हणून कमी पडल्याचे रोहितने केले मान्य! आशिया चषकासाठी बदलणार खेळण्याची पद्धत