अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलने खास कारनामा केला आहे. त्याने या सामन्यात पहिल्या डावात ६ विकेट्स घेत दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
हा दिवस-रात्र सामना कसोटी मालिकेतील तिसरा सामना असून या सामन्याच्या पहिल्या डावात अक्षरने २१.४ षटकात ३८ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. हा अक्षरचा कसोटी कारकिर्दीतील दुसराच सामना आहे. विशेष म्हणजे त्याने चेन्नईला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पदार्पण करताना दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यामुळे कसोटी कारकिर्दीतील पहिल्या दोन्ही सामन्यात डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा करणारा तो भारताचा तिसराच गोलंदाज आहे. याआधी असा विक्रम केवळ मोहम्मद निसार आणि नरेंद्र हिरवाणी यांनी केला होता.
निसार यांनी १९३२ साली लॉर्ड्स येथे पदार्पण करताना पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. तर त्यानंतर १९३३ साली मुंबई येथे दुसरा कसोटी सामना खेळताना पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच हिरवाणी यांनी तर १९८८ साली चेन्नई येथे वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पण करताना दोन्ही डावात प्रत्येकी ८ विकेट्स घेतल्या होत्या. तर न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरु येथे दुसरा सामना खेळताना त्यांनी दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या.
विशेष म्हणजे अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम अक्षरचे घरचे मैदान आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना आणखी खास आहे. या सामन्यात अक्षरने जॅक क्रॉली, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना बाद केले.
या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव ४८.४ षटकात ११२ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून अक्षर व्यतिरिक्त आर अश्विनने ३ आणि इशांत शर्माने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
इशांतची शंभरी! कारकिर्दीतील महत्त्वाच्या सामन्यात खेळताना केले ‘हे’ मोठे विक्रम