मुंबई । इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील चौथा सामना सोमवारी (२८ मार्च) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात वानखेडे स्टेडियमवर पार पडला. हे दोन्ही संघ स्पर्धेत नवीन असल्याने या दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने ५ विकेट्सने विजय मिळवला आणि स्पर्धेची विजयी सुरुवात केली. असे असले तरी, लखनऊचा २२ वर्षीय खेळाडू आयुष बदोनी याने त्याच्या अर्धशतकी खेळीने सर्वांचीच वाहवा मिळवली. याबरोबरच त्याने मोठा विक्रमही केला.
आयुष बदोनीचा मोठा विक्रम
आयुष बदोनीचा (Ayush Badoni) हा आयपीएल पदार्पणाचा सामना होता. त्याने आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात ४१ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. या खेळीदरम्यान त्याने चहूबाजूंनी फटकेबाजी केली. या खेळीबरोबरच तो आयपीएलमध्ये पदार्पणात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा तो तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात युवा खेळाडू ठरला.
आयुष बदोनीने जेव्हा सोमवारी गुजरात विरुद्ध अर्धशतक केले, तेव्हा त्याचे वय २२ वर्षे ११५ दिवस होते. आयपीएलमध्ये पदार्पणात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर श्रीवत्स गोस्वामी आहे. त्याने १९ वर्षे १ दिवस वय असताना दिल्ली फ्रँचायझीविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. तसेच दुसऱ्या क्रमांकावर देवदत्त पडिक्कल आहे. पडिक्कलने २० वर्षे ७६ दिवस वय असताना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध अर्धशतक केले होते.
याशिवाय आयुष बदोनी आयपीएल पदार्पणात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा नववा खेळाडू आहे. तसेच तो आयपीएल पदार्पणात ६ व्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजीला येत ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा पहिलाच खेळाडू आहे.
आयपीएल पदार्पणात ५०+ धावा करणारे सर्वात युवा खेळाडू
१९ वर्षे, १ दिवस – श्रीवत्स गोस्वामी, ५२ धावा, विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
२० वर्षे, ७६ दिवस – देवदत्त पडिक्कल, ५६ धावा, विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
२२ वर्षे ११५ दिवस – आयुष बदोनी, ५४ धावा, विरुद्ध गुजरात टायटन्स
२२ वर्षे १३६ दिवस – शिखर धवन, ५२* धावा, विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२२ वर्षे १८७ दिवस – डेव्हिड वॉर्नर, ५१ धावा, विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
आयुष बदोनीची शानदार खेळी
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊने २९ धावांत ४ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर दिपक हुडा आणि आयुष बदोनीने संघाचा डाव सावरला. दिपक आणि आयुष या दोघांनी ८७ धावांची भागीदारी रचली. दिपक ५५ धावांवर बाद झाला. त्यानंतर आयुषने कृणाल पंड्यासह ४० धावांची भागीदारी करताना अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे लखनऊ संघाला १५८ धावांपर्यंत पोहचता आले.
गुजरातने जिंकला सामना
या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १५८ धावा केल्या होत्या आणि गुजरातला १५९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग गुजरातने १९.४ षटकात ५ बाद १६१ धावा करत पूर्ण केला आणि सामना ५ विकेट्सने जिंकला.
महत्त्वाची बातम्या –
नव्या कर्णधाराचं चहलकडून तोंडभरून कौतुक; म्हणाला, ‘रोहित भारताला टी२० विश्वचषक जिंकून देईल’
मोठी बातमी! सेमीफायनलच्या एक दिवस आधीच वेस्ट इंडिजला झटका; ‘या’ अनुभवी गोलंदाजाला कोरोनाची लागण