पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याने गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. फलंदाजी असो किंवा संघाचे नेतृत्व या दोन्ही जबाबदाऱ्या त्याने योग्यरीत्या पार पाडल्या आहेत. तसेच तो आयसीसीच्या टी-२० क्रमवारीमध्ये दुसऱ्या तर वनडे क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान आहे. फलंदाजीमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या बाबर आजमने वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडत नवीन विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाला साजेशी सुरुवात करण्यात अपयश आले होते. ५ व्या षटकात शर्जील खान बाद झाल्यानंतर बाबर आजम फलंदाजीला आला होता. त्याने या डावात ४० चेंडूंमध्ये ४ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ५१ धावांची खेळी केली. हे त्याचे टी२० कारकिर्दीतील २० वे अर्धशतक होते. हे अर्धशतक झळकावताच त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडून काढला आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने ६२ डावात २० अर्धशतके झळकावली होती. हाच कारनामा बाबर आजमने अवघ्या ५६ डावात केला आहे. तसेच मुख्य बाब म्हणजे हिटमॅन रोहित शर्माने हा कारनामा ९९ टी२० डावात केला होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाला २० षटक अखेर ८ बाद १५७ धावा करण्यात यश आले होते. या डावात पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम याने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद रिजवान याने ४६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघातील फलंदाजांना २० षटक अखेर ४ बाद १५० धावा करण्यात यश आले. हा सामना वेस्ट इंडिज संघाने ७ धावांनी गमावला. वेस्ट इंडिज संघाकडून निकोलस पूरनने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. (Babar azam broke Virat Kohli’s big record now rohit sharma is the target)
बाबर आजमची टी-२० क्रिकेटमधील कारकीर्द
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याने आतापर्यंत ५९ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४६.९ च्या सरासरीने २२०४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १ शतक आणि २० अर्धशतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ धुरंधरावर सीएसकेचे लक्ष! तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये अवघ्या ५ सामन्यात चोपल्यात २९६ धावा
Video: कॅम्पमध्ये परतला कर्णधार अय्यर, दिल्ली कॅपिटल्सला चँपियन बनवण्यासाठी लावणार पूर्ण जोर
टी२० विश्वचषकासाठी हर्षा भोगलेंनी निवडला भारताचा संघ, ‘या’ सलामीवीराला ठेवले बाहेर