गेल्या पाच दिवसांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत होते. या सामन्याच्या पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावात भारतापुढे ४०७ धावांचे तगडे आव्हान उभारले होते. परंतु, रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी भागिदारी आणि आर अश्विन व हनुमा विहारी यांच्या चिवट झुंजीमुळे सामना अनिर्णीत राखण्यात भारताला यश आले. मात्र भाजप नेते बाबुल सुप्रियो हे विहारीच्या खेळीवर नाराज असल्याचे दिसून आले.
पंत-पुजारानंतर जबाबदारी विहारीच्या खांद्यावर
यजमान संघाच्या मार्नस लॅब्यूशाने, स्टिव्ह स्मिथ आणि कॅमरॉन ग्रीन या फलंदाजांच्या मोठ्या आकडी धावसंख्येमुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चारशेपार धावांची भलीमोठी आघाडी मिळवली होती. प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीरांना खास कामगिरी करता आली. तर कर्णधार अजिंक्य रहाणेदेखील दुसऱ्या डावात अवघ्या ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर पंत आणि पुजाराने धडाकेबाज फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. परंतु अंतिम घडीला त्यांची विकेट पडली. अशात सर्व जबाबदारी विहारीच्या खांद्यावर होती.
वेदना होत असतानाही सामना संपेपर्यंत केली फलंदाजी
मैदानावर टिकून धिम्या गतीने विहारी डावास चालना देत होता. अशात फलंदाजी करताना त्याच्या स्नायूंमध्ये ताण आल्याने त्याला वेदना होऊ लागल्या. तरीही त्याने जिद्दीने शेवटच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली. यावेळी १६१ चेंडूंचा सामना करताना ४ चौकारांच्या मदतीने २३ धावा त्याने केल्या.
भाजप नेत्याने विहारीला म्हटले क्रिकेटचा हत्यारा
परंतु भाजपचे नेता बाबुल सुप्रियो विहारीच्या संथ फलंदाजीने नाखुश असल्याचे दिसले. सामन्यानंतर त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत लिहिले की, “७ धावा करण्यासाठी हनुमा विहारीने १०९ चेंडू खेळले. विहारीने केवळ ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या भारतीय संघाच्या सर्व शक्यतांना मारुन टाकले नाही, तर अक्षरश: क्रिकेटची हत्या केली.”