---Advertisement---

कौतुकास्पद! भारतीय महिला फुटबॉलर बाला देवीने रचला इतिहास

On: मंगळवार, डिसेंबर 8, 2020 11:17 PM
---Advertisement---

भारतीय महिला फुटबॉल संघाची अनुभवी खेळाडू बाला देवी हिने भारतीय फुटबॉलच्या ‌इतिहासात आपल्या नावाची नोंद केली आहे. युरोपमधील कोणत्याही व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये गोल करणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली. रेंजर्स एफसीकडून खेळताना मदरवॉल संघाविरुद्ध तिने ही कामगिरी केली.

बाला देवीने झळकावला ऐतिहासिक गोल
स्कॉटीश वुमन्स प्रीमियर लीगमधील रेंजर्स एफसीविरुद्ध मदरवॉल यांच्यातील सामना रविवारी पार पडला. या सामन्यात रेंजर्स एफसीने मदरवॉल संघाचा ९-० अशा गोल फरकाने एकतर्फी धुव्वा उडवला. सामन्यातील ८५ व्या मिनिटाला बाला देवीने एकटीने चालत गोलपोस्टचा वेध घेतला. याच बरोबर युरोपमधील कोणत्याही व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये गोल करणारी ती पहिली महिला भारतीय फुटबॉलर ठरली. या सामन्यात रेंजर्स एफसीकडून लिझी अर्नॉट व कर्त्झी होवाट यांनी हॅट्रिक साजऱ्या केल्या.

जानेवारी महिन्यात झाली होती करारबद्ध
बाला देवीने या वर्षाच्या सुरुवातीला स्कॉटीश फुटबॉल क्लब रेंजर्स एफसीसोबत करार केला होता. त्याच वेळी ती युरोपीयन क्लबसोबत करारबद्ध झालेली पहिली भारतीय महिला फुटबॉलर ठरली. रेंजर्स एफसी व सेल्टीक एफसी या ‘ओल्ड फर्म डर्बी’ मध्ये तिने सहभाग नोंदवलेला.

भारताची प्रमुख महिला फुटबॉलपटू आहे बाला देवी
बाला देवी भारताच्या महिला फुटबॉल संघाची प्रमुख फुटबॉलपटू आहे. सन २०१० मध्ये वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी तिने भारतीय संघाकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तिने आजतागायत भारताकडून ८० सामने खेळताना ६५ गोल झळकावले आहेत. भारताकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या महिला फुटबॉलपटूंच्या यादीत देखील ती अव्वलस्थानी आहे. बाला देवीने काहीकाळ भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले होते.

संबंधित बातम्या:
– “विराट, मला RCB मध्ये स्थान मिळेल का?” व्हिडिओ शेअर करत स्टार फुटबॉलपटूचा प्रश्न
– आयएसएल २०२०: कोलकाता संघांकडून बाला देवीला महिला डर्बीची अपेक्षा
आयएसएल २०२०: बंगळुरू- नॉर्थईस्ट सामना बरोबरीत; युनायटेड एफसीने गाठला पॉईंट टेबलमध्ये दुसरा क्रमांक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---