चेन्नई सुपर किंग्जच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डानं संघाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानच्या ना हरकत प्रमाणपत्राची (NOC) मुदत काही काळासाठी वाढवली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि बीसीसीआयच्या विनंतीनंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डानं हा निर्णय घेतला.
मुस्तफिजूर यापूर्वी 30 एप्रिल रोजी बांग्लादेशला परतणार होता, मात्र आता तो 2 मे रोजी मायदेशी परतणार आहे. अशाप्रकारे, तो 1 मे रोजी चेन्नई मध्ये होणाऱ्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
मुस्तफिजुर रहमाननं आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. तो एका सामन्याला मुकला होता, कारण त्याला अमेरिकेच्या व्हिसा प्रक्रियेसाठी मायेदेशी जावं लागलं होतं. आता तो पुढील 4 सामन्यांसाठी उपलब्ध असेल. चेन्नईला 19 आणि 23 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सलग दोन सामने तर 28 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आणि 1 मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध सामना खेळायचा आहे.
मुस्तफिजूर रहमान 1 मे नंतर मायदेशी परतेल. 2 मे पासून बांग्लादेश विरुद्ध झिम्बाब्वे टी-20 मालिका सुरू होत आहे. यानंतर संघाला 21 मे पासून टेक्सासमध्ये अमेरिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. यामुळे, तो चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2024 चे उर्वरित सामने खेळू शकणार नाही. 1 मे रोजी होणारा सामना त्याचा या हंगामातील शेवटचा सामना असेल.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट ऑपरेशन्सचे उपव्यवस्थापक शहरयार नफीस म्हणाले, “आम्ही मुस्तफिजूरला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत सुट्टी दिली होती. परंतु चेन्नईचा सामना 1 मे रोजी असल्यानं चेन्नई आणि बीसीसीआयकडून त्याच्यासाठी विनंती करण्यात आली. त्यामुळे आम्ही त्याची रजा एका दिवसानं वाढवली आहे.”
मुस्तफिजूर रहमाननं चेन्नईसाठी या हंगामात उत्कृष्ट कामिगिरी केली आहे. त्याच्या नावे 5 सामन्यांत 10 बळी आहेत. याशिवाय तो ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीतही आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दिनेश कार्तिक, रिंकू सिंह की हार्दिक पांड्या? टी20 विश्वचषकात कोण असेल टीम इंडियाचा फिनिशर?
262 धावा करूनही 25 धावांनी हारली आरसीबी, चिन्नास्वामीवर चौकार-षटकारांचा पाऊस!