मुंबई:- बी.ए.आर.सी.ने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या व्यावसायिक गटात उपांत्य फेरी गाठली. कुमार गटाच्या पश्र्चिम विभागात पार्ले स्पोर्टस् – अ ने उपांत्य फेरीत धडक दिली. मुंबई उपनगरने संयोजन संस्था, चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवली, सेक्टर – २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. बी.ए.आर.सी.ने व्यावसायिक गटात शुभश्री इंटरप्रेजेसचा १९-०९ असा पाडाव करीत हा मान मिळविला. सुकेश जगताप, चिराग राणे यांच्या चढाई पकडीच्या सर्वांगसुंदर खेळामुळे हे शक्य झाले. उपांत्य फेरीत त्यांची गाठ साईश्रद्धा सप्लिमेशन संघाशी पडेल.
पश्र्चिम विभागीय कुमार गटात पार्ले स्पोर्टस् – अ ने सह्याद्री क्रीडा मंडळाचा प्रतिकार ३८-१७ असा सहज मोडून काढत प्रथम उपांत्य फेरी गाठली. आक्रमक सुरुवात करीत २लोण देणाऱ्या पार्ले संघाने पूर्वार्धात २५-०५ अशी आघाडी घेत आर्धे काम फत्ते केले. उत्तरार्धात आणखी १३ गुण घेत आपला विजय निश्र्चित केला. ईशांत शिंदे, प्रशांत पवार, अभिषेक यादव यांच्या झंझावाती खेळाने पार्लेकरांना हा मोठा विजय शक्य झाला. सह्याद्रीचा उत्तम नार्वेकर उत्तरार्धात चमकला.
याच गटात उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिद्धिविनायक – अ ने संघर्ष – अ ला ३२-१६ असे नमवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. मध्यांतराला २०-१० अशी आघाडी घेणाऱ्या सिद्धिविनायकने नंतर सावध खेळ करीत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ओम् कुदळे, साई जाधव यांच्या चतुरस्त्र खेळाने हा विजय साध्य केला. संघर्षचा निमिष यादव बरा खेळला. दुसऱ्या सामन्यात जाखमाता मंडळाने रत्नदीप मंडळाचे आव्हान १९-१६ असे संपुष्टात आणले. विश्रांतीला १३-०५ अशी आघाडी घेणाऱ्या जाखमाताला नंतर मात्र विजयासाठी रत्नदीप संघाने चांगलेच झुंजविले. विजयी संघाचे दर्शन नाक्ती, अर्पित धनावडे उत्कृष्ट खेळले. विश्रांतीनंतर सुर सापडलेल्या रत्नदिपच्या रितेश मोरे, सुशांत मेने यांनी संघाचा विजय आवाक्यात आणला होता. पण वेळेचे गणित नजमल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.