ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यांत भारतीय संघाचा पराभव झाला आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराह, यशस्वी जयस्वाल आणि नितीश रेड्डी यांच्याशिवाय इतर खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर अनेक खडतर प्रश्न उभे आहेत. दरम्यान आता पाकिस्तानचे माजी फलंदाज बसित अली यांनी गंभीरवर जोरदार टीका करत, त्याला कोचिंगची कला अवगत नाही, असा हल्लाबोल केला आहे.
बसित अली त्यांच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाले की, “गौतम गंभीरला कोचिंगची कला माहित नाही. त्यानं केकेआरला ट्रॉफी जिंकून दिली यात शंका नाही, परंतु टी20 क्रिकेटसाठी जास्त कोचिंगची गरज नसते. कसोटी सामन्यात प्रशिक्षकाचीही कसोटी घेतली जाते. मैदानाबाहेर बसून प्रशिक्षक काय विचार करतो आणि काय नियोजन करतो, याची परीक्षा असते.”
बसित अली पुढे म्हणाले की, “गौतम गंभीरनं पत्रकार परिषदेत येऊन शेवटच्या कसोटीसाठी प्लेइंग 11 ची घोषणा करायला हवी होती. याद्वारे तो ऑस्ट्रेलियावर पलटवार करू शकला असता. पण त्यानं तसं केलं नाही. गंभीरनं फक्त आकाशदीपच्या दुखापतीबद्दल सांगितलं. त्याचबरोबर सिडनी कसोटीत कर्णधार कोण असेल हेही त्यानं स्पष्ट करायला हवं होतं.”
यासोबतच बसित अली यांना गौतम गंभीरचं मैदानात जसप्रीत बुमराहशी एकटं बोलण्याचा प्रकारही आवडला नाही. ते म्हणाले की, एकीकडे तुम्हाला ड्रेसिंग रुममधील गोष्टी बाहेर जाऊ नयेत असं वाटतं आणि तुम्ही स्वतः जसप्रीत बुमराहशी मैदानावर एकटे बोलत आहात, हे चांगलं लक्षण आहे का? तुम्ही काय बोलत आहात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही हे सर्व ड्रेसिंग रूममध्ये केलं पाहिजे.”
पाचव्या कसोटीच्या पूर्वसंध्येला ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या चर्चेच्या प्रश्नावर गौतम गंभीर म्हणाला, “मला वाटत नाही की मला कोणतीही प्रतिक्रिया देण्याची गरज आहे. खरं सांगायचं तर मी एवढेच सांगू शकतो, “जर तुम्हाला पुढे जायचं असेल आणि मोठ्या गोष्टी साध्य करायच्या असतील तर प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे.”
पत्रकार परिषदेतील रोहित शर्माच्या अनुपस्थितीबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना गंभीर म्हणाला, “मुख्य प्रशिक्षक येथे आहे, हे पुरेसं आहे. रोहितसोबत सर्व काही ठीक आहे”. भारतीय कर्णधार सिडनी कसोटीत अंतिम अकराचा भाग असेल की नाही, याची पुष्टी गंभीरनं केलेली नाही. तो म्हणाला की, आम्ही विकेट बघू आणि उद्या संघ निश्चित करू.
हेही वाचा –
“रोहित शर्माने निवृत्ती घेतली तर आश्चर्य वाटणार नाही…”, माजी प्रशिक्षकाच्या वक्तव्यानं खळबळ!
“रोहितने अशाप्रकारे सोडून जाऊ नये”, माजी क्रिकेटपटूचा हिटमॅनला पूर्ण पाठिंबा
मोठी बातमी! रोहित शर्माची सिडनी कसोटीतून माघार, हा खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व