---Advertisement---

MPL 2025: एमपीएल 2024 मध्ये ‘या’ फलंदाजांच्या बॅटमधून ‘रन बरसे’

On: मंगळवार, मे 27, 2025 3:51 PM
---Advertisement---

MPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजन करत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) स्पर्धेचा नवा हंगाम लवकरच सुरू होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा 4 जून ते 24 जून या कालावधीत खेळली जाईल. महाराष्ट्रातील सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहत असतात. या नव्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी, आपण काही महत्त्वाच्या आकडेवारीवरून जर टाकत आहोत. एमपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांविषयी आपण जाणून घेऊया.

एमपीएल 2023 प्रमाणे एमपीएल 2024 मध्ये देखील पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाच्या अनुभवी अंकित बावणे (Ankeet Bawne) याचाच बोलबाला राहिला. अंकित याने सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक धावा बनवत, ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली. त्याने दुसऱ्या हंगामात 12 सामने खेळताना 51 च्या सरासरीने 415 धावा केल्या. त्याने हंगामात चार अर्धशतके झळकावली.

अंकित बावणे याच्या सोबतीने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा कर्णधार राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) हादेखील एमपीएल 2024 मध्ये चमकला होता. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने त्याने संघाच्या विजयाचे योगदान दिलेले. त्रिपाठीने कोल्हापूरसाठी आपला पहिला हंगाम खेळताना 10 सामन्यात 45.56 च्या शानदार सरासरीने 383 धावा चोपलेल्या. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट 210 इतका जबरदस्त राहिलेला.

छत्रपती संभाजी किंग्स संघाचा सलामीवीर ओम भोसले (Om Bhosale) त्याच्या शानदार कामगिरीने चर्चेत आला होता. त्याने संपूर्ण स्पर्धेत आपली कामगिरी ढळू दिली नाही. कर्णधार मूर्तझा ट्रंकवाला याच्यासोबत तो संघाला आश्वासक सुरूवात देण्यात यशस्वी ठरलेला. त्याने हंगामात 11 सामन्यात 380 धावा काढल्या होत्या.

ईगल नाशिक टायटन्स संघाने एमपीएल 2024 ची अंतिम फेरी गाठली होती. संघाच्या या यशात आक्रमक फलंदाज अथर्व काळे (Atharva Kale) याचे विशेष योगदान राहिलेले. अथर्व याने 13 सामने खेळताना 47.25 च्या सरासरीने व 165 च्या स्ट्राईक रेटने 378 धावा कुटलेल्या. त्याच्या नावे एमपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक 32 षटकार मारण्याचा विक्रम देखील जमा झालेला.

एमसीए अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितल्याप्रमाणे, एमपीएल 2025 व डब्ल्यूएमपीएल 2025 या दोन्ही स्पर्धा गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणार आहेत. एमपीएलची सुरुवात 4 जूनपासून तर डब्लूएमपीएलची सुरुवात 5 जूनपासून होईल. या दोन्ही स्पर्धांसाठी चाहत्यांना कोणत्याही तिकिटाविना प्रवेश मिळणार आहे. हे सामने ओटीटी प्लॅटफॉर्मवर JioHotstar तर टेलिव्हिजनवर Star Sports 2 वर पाहता येणार आहेत.
(MPL 2025 Live Telecast On JioHotstar And Star Sports 2 TV Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---