फेब्रुवारी-मार्च महिन्यादरम्यान इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. काही दिवसांपुर्वीच बीसीसीआयने या दौऱ्यावर भारत आणि इंग्लंड संघात होणाऱ्या वनडे, टी२० आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सोबतच या मालिकेसाठी जागादेखील निश्चित करण्यात आली आहे. मात्र काही राज्यांनी बोर्डाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई-बंगालला नाही मिळाले यजमानपद
कित्येक राज्यांच्या संघटनांनी आयोजित जागांना या महिन्यात होणाऱ्या बीसीसीआय निवडणुंकीच्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली आहे. बंगाल आणि मुंबई राज्याच्या बोर्डांनी त्यांना एकही सामना न मिळाल्याने वेळापत्रकावर आक्षेप घेतला आहे. तर गुजरात क्रिकेट संघाला १२ पैकी ७ सामन्यांचे यजमानपद मिळाले आहे. तसेच पुणे आणि चेन्नई क्रिकेट संघालाही यजमानपद मिळाले आहे. चेन्नईत २ कसोटी सामने आणि पुण्यात ३ वनडे सामने होणार आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे म्हणणे आहे की, त्यांना गेल्या चार वर्षांमध्ये एकाही कसोटी सामन्याचे यजमानपद मिळालेले नाही. तसे तर, मुंबईचे वानखेडे स्टेडियम आणि कोलकाताचे ईडन गार्डन स्टेडियम हे भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध स्टेडियम आहेत. तरीही येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघातील एकही सामना आयोजित करण्यात आलेला नाही.
राज्य बोर्डांना आर्थिक स्थिती बिघडण्याची चिंता
महत्त्वाचे म्हणजे, बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने एका मुलाखतीत म्हटले होते की, “मुंबई आणि कोलकाताला या दौऱ्यातील सामन्यांचे यजमानपद मिळेल.” परंतु, आता स्थिती उलटी झाल्यामुळे या दोन्ही राज्यांच्या बोर्डानी थेट बीसीसीआयच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
राज्य बोर्डांना या गोष्टीची चिंता सतावत आहे की, जर अधिक काळासाठी त्यांना सामन्यांचे यजमानपद मिळाले नाही. तर त्यांची आर्थिक स्थिती बिघडू शकते. कारण बीसीसीआय एका कसोटी सामन्यासाठी राज्यांच्या बोर्डांना २.५ कोटी रुपये देते. तर एका वनडे आणि टी२० सामन्यासाठी १.५ कोटी रुपये देतात.
महत्त्वाच्या बातम्या-
साहा आणि पंतमध्ये कोण असावा पहिल्या कसोटीत यष्टीरक्षक?, माजी दिग्गजाची ‘या’ खेळाडूला पसंती