---Advertisement---

बीसीसीआयची ‘या’ दिवशी होणार विशेष बैठक; उर्वरित आयपीएल २०२१ बाबत होऊ शकतो महत्त्वाचा निर्णय

On: शुक्रवार, मे 28, 2021 5:09 PM
---Advertisement---

भारतात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम मोठ्या प्रमाणात क्रिकेट क्षेत्रावरही होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम २९ सामने खेळवण्यात आल्यानंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. तसेच आता याचवर्षी भारताला टी२० विश्वचषकाचे आयोजन करायचे आहे, पण भारतातील परिस्थिती सध्या बिकट आहे. या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी शनिवारी (२९ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) विशेष बैठक घेणार आहे. या बैठकीत भारतातील अगामी क्रिकेट हंगामाबद्दल चर्चा होईल.

बीसीसीआयला टी२० विश्वचषक भारतात आयोजित करायचा आहे. यासाठी आयसीसी १ जून रोजी बैठक घेणार आहे. त्यावेळी आयसीसी भारतीतील परिस्थितीची समीक्षा केली जावी, असाच निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी बीसीसीआयची बैठक होत आहे.

आयपीएलच्या उर्वरित हंगामाबद्दलही चर्चा 
बीसीसीआय शनिवारी होणाऱ्या बैठकीत उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाबाबतही निर्णय घेण्याची शक्यता आहे. सध्यातरी चर्चा आहे की १९ किंवा २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान युएईमध्ये हा उर्वरित हंगाम खेळवला जाऊ शकतो.

दरम्यान, या बैठकीत परदेशी खेळाडूंची उपलब्धता, बायोबबल, अशा अनेक गोष्टींवरही चर्चा होईल. कारण काहीदिवसांपूर्वीच इंग्लंडने त्यांचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त असल्याने उर्वरित आयपीएल २०२१ साठी अनुपस्थित असतील, असे स्पष्ट केले आहे. तसेच जर सप्टेंबरमध्ये या हंगामाचे आयोजन झाले तर इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय खेळाडूंना चार्टर्ड विमानाने युएईला आणावे लागेल.

एवढेच नाही तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकापूर्वी भारताला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळायच्या होत्या, मात्र, जर आयपीएलचा हंगाम खेळवण्यात आला तर या मालिका रद्द केल्या जाऊ शकतात, त्यामुळे या सर्व गोष्टींवर बीसीसीआयच्या बैठकीत चर्चा होईल.

टी२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा
बीसीसीआयच्या या बैठकीत टी२० विश्वचषक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. कारण भारतात वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता हा विश्वचषक भारतातून युएईमध्ये हलवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत जर या विश्वचषकापूर्वी आयपीएलचे आयोजन युएईमध्ये झाल्यास अबुधाबी, दुबई आणि शारजाह या मैदानातील खेळपट्ट्या खराब होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआय कदाचीत आयपीएलसाठी केवळ २ मैदानांची मागणी करु शकतात.

तरी, बीसीसीआय हा विश्वचषक भारतातच खेळवण्याच्यादृष्टीने प्रयत्न करेल. पण असे असले तरी आयपीएलमध्ये ८ संघांचे सामने यशस्वीरित्या घेण्यात अपयश आले असताना १६ संघांचे यजमानपद बीसीसीआय कसे सांभाळणार हा देखील प्रश्न आहे.

देशांतर्गत स्पर्धांबाबतही चर्चा
कोरोनाच्या परिस्थितीमुळे रणजी क्रिकेटचा हंगाम रद्द करण्यात आला होता. ज्यामुळे जवळपास ७०० खेळाडूंवर परिणाम झााल आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनाबाबतही चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मी फक्त रिषभसाठी कसोटी क्रिकेट पाहतो”, इंग्लंडच्या गोलंदाजाने केली मुक्तकंठाने प्रशंसा

राखीव दिवस ते रिव्ह्यू, कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी ‘असे’ आहेत आयसीसीचे नियम व अटी

क्या बात! केवळ १२ महिन्यात ‘या’ महिला खेळाडूने कमावलेत तब्बल ४०२ कोटी रुपये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---