देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर कोरोनादरम्यानची ही भारतातील दुसरी स्पर्धा असेल. मानाची प्रथमश्रेणी स्पर्धा रणजी ट्रॉफी रद्द झाल्याने या स्पर्धेचा मान वाढला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धेच्या तारखांविषयी नुकतीच घोषणा केली.
या तारखेला सुरू होईल स्पर्धा
बीसीसीआयने जाहीर केल्यानुसार, २० फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होईल. स्पर्धेचा अंतिम सामना १४ मार्च रोजी होईल. बोर्डाने या स्पर्धेसाठी ६ शहरांची निवड केली असून त्यामध्ये दिल्लीला जागा मिळू शकली नाही. गतविजेत्या कर्नाटकसह ३८ संघ या स्पर्धेत खेळतील. सर्व संघांना ६ गटात विभागले गेले आहे. त्यापैकी पाच एलिट गटात प्रत्येकी सहा तर सहाव्या प्लेट गटात आठ संघांचा समावेश आहे. कर्नाटक या स्पर्धेचा गतविजेता आहे.
११ मार्च रोजी होणार दोन्ही उपांत्य सामने
गट फेरीनंतर ७ मार्चपासून उपउपांत्यपूर्व सामने खेळले जातील. उपांत्यपूर्व फेरी ८ आणि ९ मार्च रोजी होईल. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने ११ मार्चला तर अंतिम फेरी १४ मार्चला होईल. सर्व सामने सूरत, इंदोर, बेंगलोर, जयपूर, कोलकाता आणि चेन्नई येथे खेळले जातील. कोरोना रुग्णसंख्येत घट होत असतानाही दिल्लीला या स्पर्धेच्या आयोजनातून वगळण्यात आले आहे. यापूर्वी सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेचा एकही सामना दिल्लीत झाला नव्हता.
खेळाडूंच्या होणार कोरोना चाचणी
वेळापत्रकानुसार सर्व खेळाडूंना स्पर्धा सुरू होण्याच्या ७ दिवस आधी आयोजनस्थळी दाखल व्हावे लागेल. तेथे सर्व खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात येईल. दरम्यान, या खेळाडूंची १३,१५ आणि १७ फेब्रुवारी रोजी कोरोना चाचणी होईल. या चाचण्या नकारात्मक आल्यानंतरच खेळाडू १८ आणि १९ फेब्रुवारीला सराव करू शकतील.
या ठिकाणी होणार स्पर्धा-
एलिट अ गट- गुजरात, छत्तीसगड, हैदराबाद, त्रिपुरा, गोवा व बडोदा (सुरत)
एलिट ब गट- तमिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, झारखंड, आंध्र प्रदेश व विदर्भ (इंदोर)
एलिट क गट- कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, ओडिसा, रेल्वे व बिहार (बेंगलोर)
एलिट ड गट- मुंबई, महाराष्ट्र, दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान व पॉन्डेचेरी (जयपुर)
एलिट ई गट- बंगाल, सेनादल, जम्मू आणि काश्मीर, सौराष्ट्र हरियाणा व चंदिगड (कोलकाता)
प्लेट फ गट- उत्तराखंड, आसाम, नागालँड, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम व सिक्कीम (चेन्नई)
महत्वाच्या बातम्या:
श्रेयस अय्यर आणि चहलची पत्नी धनश्री वर्माचा भन्नाट डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल
हा आयपीएल संघ बदलणार नाव आणि लोगो? लवकरच होणार घोषणा
तुम्ही आमचा कोहिनूर द्या आणि, भारतीय चाहत्याचे मायकेल वॉनला सडेतोड उत्तर