भारतीय संघ लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा मालिकेतून बाहेर झाला आहे. तसेच विराट कोहली देखील वनडे मालिकेतून बाहेर होणार असल्याचे म्हटले जात आहे. विराट कोहली वनडे मालिका खेळणार की माघार घेणार? याबाबत आता आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, “विराट कोहलीने अजूनही बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली किंवा सचिव जय शाह यांना वनडे मालिका न खेळण्यासाठी कोणतीही औपचारिक विनंती केली नाहीये. जर नंतर कुठला निर्णय घेण्यात आला किंवा तो दुखापतग्रस्त झाला तर ती वेगळी गोष्ट असेल. आजच्या स्थितीच्या अनुसार तो १९, २१ आणि २३ जानेवारी रोजी होणाऱ्या वनडे सामन्यांमध्ये खेळणार आहे.”
दक्षिण आफ्रिकेत ऑमीक्रॉनची भीती पाहता खेळाडू कडक बायो बबलमध्ये असणार आहे. त्यामुळे खेळाडू चार्टर्ड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील त्यांच्यासोबत रवाना होणार आहेत.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले की, “कर्णधार आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत प्रवास करणार आहे. जर कसोटी मालिका झाल्यानंतर त्याला बायो बबलचा थकवा जाणवत असेल आणि त्याला विश्रांती हवी असेल, तर तो नक्कीच जय शाह आणि सौरव गांगुली यांच्याशी संपर्क करेल.”
विराट कोहलीची ही बायो बबलच्या थकव्यामुळे विश्रांती घेण्याची पहिली वेळ नसेल. त्यापूर्वी देखील त्याने बायो बबलच्या थकव्यामुळे विश्रांती घेतली होती. त्याचे स्पष्ट मत आहे की, सतत बायो बबलमध्ये राहिल्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीने पितृत्व रजा घेतली होती, तर मायदेशात न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत देखील सहभाग घेतला नव्हता.
आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, विराट कोहली दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतून माघार घेणार की नाही.
महत्वाच्या बातम्या :
कुलदीप यादवच्या कामगिरीतील घसरणीचं कारण एमएस धोनी? वाचा सविस्तर
“रहाणेला पुन्हा उपकर्णधार बनवा”; दिग्गजाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी केली मागणी
ना विराट… ना रोहित… ‘हा’ असणार भारताचा नवा कर्णधार? बीसीसीआय देणार मोठा धक्का?