जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम ४ मे रोजी स्थगित केला गेला होता. काही खेळाडू व प्रशिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हा निर्णय घेतला होता. त्यानंतर नुकतेच बीसीसीआयने स्पर्धेतील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) खेळण्याचे जाहीर केले आहे. आताच याबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी व तयारी पाहण्यासाठी बीसीसीआयचे पदाधिकारी दुबईला पोहोचले आहेत.
हे अधिकारी पोहोचले युएईला
आयपीएल २०२१ चे शिल्लक राहिलेले ३१ सामने युएई येथील दुबई, अबुधाबी व शारजाह मैदानांवर होणार आहेत. त्यानंतर आता आयपीएलबाबतची तयारी व इतर गोष्टींवर चर्चेसाठी बीसीसीआयचे चार वरिष्ठ पदाधिकारी येथे पोहोचले आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा, आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला दुबईत दाखल झाले असून, गांगुली व शहा हे आयसीसीच्या बैठकीत सहभागी होतील.
राजीव शुक्ला करणार चर्चा
बीसीसीआयचे उपाध्यक्ष असलेले राजीव शुक्ला यांनी आयपीएलच्या भवितव्याबाबत बोलताना म्हटले, “युएई क्रिकेट बोर्ड व इतर संघटनांशी बातचीत करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्हाला आशा आहे की, मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही आयपीएल यशस्वीरित्या पार पडेल. चाहत्यांना सामना पाहण्यासाठी येऊ द्यायचे की नाही? याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल. ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. स्पर्धेसाठी सर्व विदेशी खेळाडू नसतील. मात्र, किती विदेशी खेळाडू खेळणार यापेक्षा स्पर्धा पूर्ण खेळण्यावर आमचा भर आहे.”
राजीव शुक्ला यांनी आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना भारत व युएई येथील नियमांनुसार कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे.
तिसऱ्यांदा युएईत होणार आयपीएल
तिसऱ्यांदा आयपीएलचे आयोजन होत आहे. २०१४ मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका असल्याने पहिले २० सामने याठिकाणी करण्यात आले होते. त्यानंतर, मागील वर्षी भारतात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने संपूर्ण हंगाम युएईत खेळला गेला होता. आता स्पर्धेतील ३१ सामने अबुधाबी, दुबई व शारजाह या तीन मैदानांवर होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
सात वर्षांपूर्वी रैनाने एकाच षटकात ७ वेळा चेंडूला केले होते सीमापार, वाचा त्या सामन्याबद्दल सविस्तर
आर्चर बाबा की जय! आयपीएल पुनरागमनाच्या घोषणेनंतर ६ वर्षांपूर्वीचे ‘हे’ ट्विट व्हायरल