अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे अधिकारी पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला यांनी लाहोर येथे सामनाही पाहिला. यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआय अधिकाऱ्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर दोन्ही देशातील चाहत्यांमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होईल अशी आशा निर्माण झाली. तरीही, सध्या भारत-पाकिस्तान मालिका शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर स्वत: बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी दिले आहे.
काय म्हणाले बिन्नी?
पाकिस्तानचा दौरा केल्यानंतर भारतात परलेले बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, “आमच्यात चांगल्याप्रकारे चर्चा झाली. आमचे राजेशाही अंदाजात स्वागत केले गेले. यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाशी संबंधित व्यक्तींनी आमची विशेष काळजी घेतली.”
बिन्नी म्हणाले, “आमचा पाकिस्तान दौऱ्याचा उद्देश क्रिकेट पाहणे आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा करणे, हा होता. एकूणच हा दौरा खूपच चांगला राहिला.” यादरम्यान बिन्नी यांना विचारण्यात आले, की भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात द्विपक्षीय मालिका होईल का? यावर बिन्नी म्हणाले, “बीसीसीआय या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. हा सरकारशी संबंधित मुद्दा आहे. आपल्याला या सर्वांबाबत वाट पाहावी लागेल.” त्यांनी असेही म्हटले, “विश्वचषक जास्त दूर नाहीये. विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तान संघ भारतात येणार आहे.”
भारत आणि पाकिस्तानचा आमना-सामना कधी?
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंकेत होत आहे. भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत. याव्यतिरिक्त स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ स्पर्धेतील सुपर-4 (Super-4) फेरीत पोहोचला आहे. या फेरीत भारतीय संघ बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका संघाविरुद्ध खेळणार आहे. या फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघ 10 सप्टेंबर रोजी आमने-सामने येणार आहेत. हा सामनाही कोलंबो येथेच खेळला जाणार आहे. (bcci president roger binny on resuming india vs pakistan bilateral series said this read here)
हेही वाचाच-
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! PAKvsBAN लाईव्ह सामन्यात गेली पाकिस्तान स्टेडिअममधील लाईट, जगदुनियेत होतंय हसू
सुपर फोरमध्ये हारताच शाकिबचं लक्षवेधी विधान, आपल्याच फलंदाजांना व्हिलन ठरवत म्हणाला, ‘पाकिस्तान नंबर 1…’