रविवारी (९ मे) बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठी घोषणा केली आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर आणि इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी जुलै महिन्यात क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. या मालिकेत ५ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळवले जाणार आहेत. तसेच ही मालिका संपल्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
परंतु श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत भारतीय संघातील मुख्य खेळाडू नसणार आहेत. याचा खुलासा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केला आहे.
पीटीआयसोबत बोलताना सौरव गांगुली म्हणाले, “जुलै महिन्यात भारतीय वरिष्ठ संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या मालिकेत इंग्लंडला जाणारे खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. यामध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसून येणार नाहीत. कारण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर भारतीय संघाला ४ ऑगस्टपासून इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तसेच इंग्लंडची कोरोना नियमावली सक्त असल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंना परतीचा प्रवास करणे कठीण आहे.”
अशातच युवा खेळाडूंना चांगली संधी असणार आहे. सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि पृथ्वी शॉ यांसारख्या युवा खेळाडूंना आपली क्षमता दाखवून देण्याची चांगली संधी असणार आहे. यासोबतच हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन देखील या मालिकेचा भाग असू शकतात. तसेच आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणारे चेतन सकारिया आणि देवदत्त पडीक्कल यांना देखील सरप्राइज एन्ट्री मिळू शकते.
भारताला इंग्लंड दौऱ्यात १८ ते २२ जून दरम्यान साऊथँम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर भारताला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळायची आहे. या कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरु होणार असून १४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये भारतीय संघ श्रीलंका दौरा करु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत नव्हे तर ‘या’ देशात होणार आयपीएल २०२१चे उर्वरित सामने, बीसीसीआय अध्यक्षाने दिला इशारा
इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका ‘अशा’ फरकाने जिंकेल टीम इंडिया, ‘द वॉल’ द्रविडची भविष्यवाणी