जगभरात पुन्हा एकदा कोविड-१९ (Covid-19) महामारीने डोके वर काढले आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. क्रिकेट क्षेत्रातही याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय, BCCI) आयपीएल २०२२ च्या आयोजनासंदर्भात प्लॅन बी (Plan B) वर विचार करत आहे. तसेच मेगा लिलावाची तारिखही पुढे ढकलण्याची तयारी सुरू असल्याचे समजत आहे.
भारतातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे बीसीसीआयला रणजी ट्रॉफीसहित बऱ्याच देशांतर्गत स्पर्धा स्थगित कराव्या लागल्या आहेत. यानंतर बीसीसीआय आगामी आयपीएल २०२२ (Mega Auction 2022) च्या आयोजनासाठी प्लॅन बीची योजना करते आहे. क्रिकबजमधील अहवालानुसार, बोर्ड कथित स्वरुपात आयपीएलचा येता पूर्ण हंगाम मुंबई (Mumbai) या एकमात्र ठिकाणी आयोजित करण्याच्या विचारात आहेत. मुंबई शहरात सामने आयोजित करण्यासाठी बरेचशी ठिकाणे उपलब्ध आहे. यामध्येही त्यांच्याकडे २ पर्याय उपलब्ध असतील. एक म्हणजे १० केंद्र किंवा ३ केंद्र, ज्यामध्ये वानखेडे स्टेडियम, ब्रेबोर्न स्टेडियम आणि डी वाय पाटील स्टेडियम यांचा समावेश असेल.
यापूर्वी कोरोनामुळे आयपीएल २०२० चा दुसरा टप्पा आणि आयपीएल २०२१ चा संपूर्ण हंगाम संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये आयोजण्यात आला होता. त्यानंतर बीसीसीआयकडे यजमानपद असलेली टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धाही युएईच्या मैदानांवर पार पडली होती. परंतु यंदा बीसीसीआय आयपीएलचे आयोजन भारतातच करू इच्छित आहे. यासाठी आयपीएलमधील सुरुवातीचे सामने पुढे ढकलण्याच्या पर्यायावरही विचार सुरू आहेत.
हेही वाचा- भारतातही महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएलसारखी लीग असणार? जय शाह यांनी दिले ‘हे’ उत्तर
…म्हणून मेगा लिलावासही होऊ शकतो उशीर
दुसरीकडे नव्या आयपीएल फ्रँचायझी लखनऊ आणि अहमदाबाद यांच्यामुळे आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. लखनऊ संघ त्यांच्या प्रायोजकांना साईन करणे, कोचिंग स्टाफची पुष्टी करणे अशा प्रक्रियेत व्यस्त असताना, अहमदाबादचा संघ मात्र मागे पडला आहे. यूके स्थित सट्टेबाजी कंपनीसोबत त्यांच्या संबधांचा खुलासा झाल्यानंतर अद्याप सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद फ्रँचायझीच्या करारावर हस्ताक्षर केलेले नाही. त्यामुळे त्यांना यासाठी मोठ्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे.