भारतीय क्रिकेट संघात (Team India) सध्या बदलाचे वारे वाहते आहे. टी२० विश्वचषक २०२१ नंतर स्वत:हून टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी (०९ डिसेंबर) हा धक्कादायक निर्णय घेतला असून विराटच्या जागी रोहित शर्मा याच्या हाती वनडे संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात आली आहेत.
यानंतर इच्छा नसतानाही बीसीसीआयने विराटला वनडे संघाच्या नेतृत्त्वपदावरुन काढून टाकल्याची वृत्ते पुढे आली होती. त्यामुळे भारतीय चाहते बीसीसीआयच्या या निर्णयावर संतापले असून त्यांनी बोर्डावर टिकेची झोड उठवली (Indian Fans Trolled BCCI) आहे. यानंतर अखेर आता २४ तासांनी बीसीसीआयला जाग आली असून त्यांनी विराटचे आभार व्यक्त करणारी (BCCI Post About Virat Kohli) एक सोशल मीडिया पोस्ट टाकली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, विराट स्वत:हून वनडे संघाचे नेतृत्त्वपद सोडू इच्छित नव्हता. तो विश्वचषक २०२३ पर्यंत भारतीय वनडे संघाचे नेतृत्त्व करण्याच्या तयारीत होता. परंतु बीसीसीआयच्या डोक्यात वेगळीच योजना सुरू असून त्यांनी विराटला वनडे संघाचे नेतृत्त्व सोडण्यास ४८ तासांचा कालावधी दिला होता. परंतु विराटने या वेळेदरम्यान कसलीही प्रतिक्रिया न दिल्याने बीसीसीआयने स्वत:हून त्याची या पदावरुन हकालपट्टी केली आहे.
जवळपास साडे ४ वर्षे भारतीय संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या विराटला बीसीसीआयकडून अशा प्रकारची वागणूक मिळाल्याने भारतीय चाहत्यांचा संताप अनावर झाला आहे. अचानक त्याला या पदावरुन काढून टाकल्याने चाहत्यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. यानंतर ट्वीटर या सोशल मीडिया ऍपवर दिवसभर #ShameOnBCCI हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. हे पाहता, अखेर बीसीसीआयने गुरुवारी रोजी (१० डिसेंबर) विराटचे अभिवादन करणारे एक ट्वीट केले आहे.
वनडे संघाचा कर्णधार म्हणून विराटने केलेल्या नेतृत्त्व कामगिरीचा आढावा घेणारा एक फोटो बीसीसीआयने आपल्या ट्वीटमध्ये जोडला आहे. यावर कॅप्शन देत त्यांनी लिहिले आहे की, ‘धैर्य, उत्कटतेने आणि दृढनिश्चयाने भारतीय वनडे संघाचे नेतृत्व करणारा नेता. तुझे आभार कर्णधार विराट कोहली.’
A leader who led the side with grit, passion & determination. 🇮🇳🔝
Thank you Captain @imVkohli!👏👏#TeamIndia pic.twitter.com/gz7r6KCuWF
— BCCI (@BCCI) December 9, 2021
विराटचे वनडे कर्णधार म्हणून प्रदर्शन
विराट भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक राहिला आहे. त्याच्या वनडेतील नेतृत्व कामगिरीवर नजर टाकल्यास, त्याला भारताचा सार्वकालिन महान वनडे कर्णधार म्हणणे वावगे ठरणार नाही. विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने वनडेत ९५ सामने खेळले असून त्यापैकी ६५ सामने जिंकले आहेत. यादरम्यान त्याची विजयी सरासरी ७०.४३ टक्के इतकी राहिली आहे. तसेच त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने १९ तिरंगी मालिकांपैकी १५ मालिकांमध्ये बाजी मारली आहे.
नेतृत्त्वाबरोबर फलंदाजीतही तो पुढे राहिला आहे. त्याने कर्णधार असताना वनडे क्रिकेटमध्ये ७२.६५ च्या सरासरीने फलंदाजी करताना ५४४९ धावा केल्या आहेत, ज्यात २१ शतके आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणेसाठी देवाप्रमाणे धावून आला ‘हा’ दिग्गज! नाहीतर कसोटी कारकिर्द आली असती संपुष्टात
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडची कसोटीत वनडेप्रमाणे खेळी..! तेज तर्रार शतकासह बनला ‘विक्रमवीर’
हार्दिकची वनडेतील जागा धोक्यात! ‘या’ अष्टपैलूने विजय हजारे ट्रॉफीत शतक करत ठोठावलाय टीम इंडियाचं दार