दुलीप ट्रॉफी 2024 ला आजपासून सुरूवात झाली आहे. यामध्ये टीम इंडियाचे अनेक खेळाडू खेळत आहेत. श्रेयस अय्यर हा भारत ‘ड’ संघाचा कर्णधार आहे. तसेच केएस भरत आणि अक्षर पटेलही या संघात आहेत. यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत भारत ‘ब’ संघाकडून खेळत आहेत. मात्र सलामीच्या सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी, अय्यर आणि केएस भरत यांना विशेष काही करता आले नाही. टीम इंडियाला 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठी या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.
बंगळुरू येथे भारत ‘अ’ आणि भारत ‘ब’ यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात भारत ‘ब’ संघ प्रथम फलंदाजी करत आहे. यशस्वी जयस्वाल संघाची सलामी देण्यासाठी आला होता. पण त्याला विशेष काही करता आले नाही. यशस्वी 59 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. खलील अहमदने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सर्फराज खान अवघ्या 9 धावा करून बाद झाला. सर्फराजने टीम इंडियासाठी कसोटी सामने खेळले आहेत. मात्र बांग्लादेश मालिकेपूर्वी या खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारताची चिंता वाढू शकते.
अनंतपूर येथे भारत ‘क’ आणि भारत ‘ड’ यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात भारत ‘ड’ संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. अवघ्या 76 धावांवर संघाने 8 विकेट गमावल्या. अथर्व तायडे आणि यश दुबे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील इंडिया ‘ड’ संघासाठी सलामीला आले होते. यश 10 धावा करून बाद झाला तर अथर्व 4 धावा करून बाद झाला. तर कर्णधार श्रेयसही काही विशेष करू शकला नाही. तो केवळ 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत केवळ 13 धावा करून परतला.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यानंतर संघाची घोषणा करू शकते. बोर्डाची निवड समिती खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवणार आहे.
हेही वाचा-
स्टार भारतीय क्रिकेटपटूची राजकारणात एंट्री, या पक्षाची सदस्यता स्वीकारली
टी20 विश्वात खळबळ; 320 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत या खेळाडूने रचला विश्वविक्रम
टीम इंडिया सावध राहा, बांगलादेश देऊ शकतो ‘जोर का झटका’!