आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. त्याआधी पाकिस्तान संघ टी20 त्रिकोणी मालिका खेळत आहे. या मालिकेत पाकिस्तानसोबत अफगाणिस्तान आणि यूएईचे संघ सहभागी आहेत. दरम्यान, शुक्रवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात शाहीन आफ्रिदीने दोन बळी घेतले. यावेळी आफ्रिदीने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागे टाकत टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
आफ्रिदीने अफगाणिस्तानविरुद्ध केवळ 21 धावा देऊन दोन विकेट घेतल्या. आफ्रिदीने पहिले विकेट इब्राहिम जदरानला बोल्ड करून घेतले. त्यानंतर दुसरे विकेटही मुजीब उर रहमानला बोल्ड मारत मिळवले. यावेळी त्याने टी20 क्रिकेटमध्ये विकेट घेण्याच्या बाबतीत बुमराहला मागे टाकले.
बुमराहने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 20.22 च्या सरासरीने 245 सामन्यांत 313 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 6.88 इतका आहे. तर आफ्रिदीने 225 सामन्यांत 20.97 च्या सरासरीने 314 विकेट घेतल्या आहेत. आफ्रिदीचा इकॉनॉमी रेट 7.93 इतका आहे.
पाकिस्तानने सामन्यात प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 182 धावा केल्या. पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा कर्णधार सलमान आगा यांनी केल्या. सलमानने 36 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्यात त्यांनी तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. अफगाणिस्तानकडून सर्वाधिक बळी फरीद मलिक यांनी घेतले. फरीदने पाकिस्तानचे दोन गडी बाद केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची टीम 19.5 षटकांत केवळ 143 धावांवर ऑलआऊट झाली. अफ्रीदीने दोन बळी घेतले. तर हारिस रऊफने सर्वाधिक 4 बळी मिळवले. मोहम्मद नवाज आणि सुफियान मुकीम यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना 39 धावांनी जिंकला.






